राजद, काँग्रेसशी युती करणार -शरद यादव
By Admin | Updated: June 4, 2015 23:35 IST2015-06-04T23:35:11+5:302015-06-04T23:35:11+5:30
बिहारमधील विधानसभा निवडणूक काँग्रेस, राजद आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकजुटीने लढणार असल्याचे संयुक्त जदचे अध्यक्ष (जेडी- यू) शरद यादव यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

राजद, काँग्रेसशी युती करणार -शरद यादव
नवी दिल्ली : जनता परिवाराच्या विलीनीकरणाचा गुंता अद्याप सुटला नसला तरी बिहारमधील विधानसभा निवडणूक काँग्रेस, राजद आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकजुटीने लढणार असल्याचे संयुक्त जदचे अध्यक्ष (जेडी- यू) शरद यादव यांनी गुरुवारी स्पष्ट केले. भाजपविरुद्ध धर्मनिरपेक्ष युती स्थापन करण्याचा तिढा गेल्या काही आठवड्यांपासून कायम असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केले.
लालूप्रसाद यादव यांचे खास निकटस्थ आमदार भोला यादव यांनी बुधवारी भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी जनता परिवाराच्या विलीनीकरणाला होत असलेल्या विलंबाबाबत पक्षाच्या खासदार-आमदारांशी सल्लामसलत चालविल्याच्या पार्श्वभूमीवर शरद यादव यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
नितीशकुमार यांनी राजदशी युती प्रत्यक्षात न उतरल्यास काँग्रेससोबत युतीबाबत चाचपणी चालविली असल्याचे वृत्त असताना लालूप्रसाद यांनी धर्मनिरपेक्ष आघाडीसंबंधी चर्चा निष्फळ ठरल्याचे वृत्त खोडसाळ असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
राजद आणि संजद वेगळा मार्ग अवलंबणार असल्याचे तर्कवितर्क शरद यादव यांनीही फेटाळून लावले. जनता परिवाराच्या ऐक्याची घोषणा यापूर्वीच झाली आहे. ऐक्य प्रत्यक्षात येईल, असा मला विश्वास आहे, ते देशासाठी आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
४जनता परिवारातील समाजवादी पक्ष, राजद, संजद, जद(एस), आयएनएलडी आणि समाजवादी जनता पार्टी या सहा पक्षांच्या विलीनीकरणाची घोषणा एप्रिलमध्ये झाली होती.
४मुलायमसिंग यादव यांची प्रमुख म्हणून निवडही घोषित करण्यात आली, तथापि मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोेषित करण्यासह जागांच्या वाटपाबाबत नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव यांचे मतभेद उघड झाल्यानंतर विलिनीकरण अधांतरी लटकले आहे.