सरकार स्थापनेसाठी राजद प्रयत्नशील; रालोआतील घटक पक्षांना चुचकारणे सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2020 02:01 AM2020-11-13T02:01:07+5:302020-11-13T06:55:50+5:30

विकासशील इन्सान पक्ष आणि हिंदुस्तानी अवाम मोर्चाला घातली गळ

RJD strives for government formation | सरकार स्थापनेसाठी राजद प्रयत्नशील; रालोआतील घटक पक्षांना चुचकारणे सुरू

सरकार स्थापनेसाठी राजद प्रयत्नशील; रालोआतील घटक पक्षांना चुचकारणे सुरू

Next

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या राष्ट्रीय जनता दलाने सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. राष्ट्रीय जनता दलप्रणीत महाआघाडीला ११० जागांवर विजय मिळवता आला आहे. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी महाआघाडीला १२ आमदारांची गरज आहे. त्यासाठी राष्ट्रीय जनता दलाने विकासशील इन्सान पक्ष आणि हिंदुस्तानी अवाम मोर्चा या रालोआतील घटक पक्षांना चुचकारायला सुरुवात केली आहे.

अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या बिहार विधानसभा निवडणूक निकालात अखेरीस भाजपप्रणीत रालोआला १२५ जागांवर विजय मिळाला. २४३ सदस्यांच्या बिहार विधानसभेसाठी हे काठावरचे बहुमत आहे. त्यातही रालोआतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या जदयुला ४३ जागांवरच समाधान मानावे लागले, तर भाजपला घसघशीत ७४ जागांवर विजय मिळवता आला. भाजप-जदयुबरोबरच मुकेश साहनी यांचा विकासशील इन्सान पक्ष आणि जितनराम मांझी यांचा हिंदुस्तानी अवाम मोर्चा हे दोन पक्ष निवडणुकीच्या तोंडावर रालोआत सहभागी झाले.

लोक जनशक्ती पक्षाच्या फटक्यामुळे शक्तिपात झालेेल्या जदयुला सरकार स्थापनेची अजिबात उत्सुकता नाही; परंतु भाजपने नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालीच सरकार स्थापन होईल, असे स्पष्ट केले आहे. विकासशील इन्सान पक्ष आणि हिंदुस्तानी अवाम मोर्चा यांचे प्रत्येकी चार आणि एएमआयएमचे पाच आमदारांना सोबत घेतल्यास बहुमतासाठी आवश्यक असेलला १२२ चा आकडा राजदला ओलांडता येणार आहे. 

बिहार विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या राष्ट्रीय जनता दलाने सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. राष्ट्रीय जनता दलप्रणीत महाआघाडीला ११० जागांवर विजय मिळवता आला आहे. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी महाआघाडीला १२ आमदारांची गरज आहे. त्यासाठी राष्ट्रीय जनता दलाने विकासशील इन्सान पक्ष आणि हिंदुस्तानी अवाम मोर्चा या रालोआतील घटक पक्षांना चुचकारायला सुरुवात केली आहे.

तेजस्वी यादव यांचा आरोप

निवडणुकीदरम्यान रालोआने पैसा, मनगटशाही आणि दगाबाजी यांचा मुक्तहस्ते वापर केल्याने त्यांना अधिक जागा मिळाल्याचा आरोप तेजस्वी यादव यांनी केला. गुरुवारी तेजस्वी यादव यांची विधिमंडळ पक्षेनेतेपदी निवड झाली, त्यावेळी ते बोलत होते.  या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या जदयुचे नेते नितीशकुमार स्वत:च्या स्वाभिमानाला मुरड घालून मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीला चिकटून राहतील, असा चिमटा काढतानाच नितीश यांनी आता तरी खुर्चीचा मोह सोडावा, असे आवाहन तेजस्वी यांनी केले. 

जनतेने बदलाचा कौल दिला असून, नितीशकुमार यांच्याविरोधात मते दिली असल्याचे ते म्हणाले. अनेक ठिकाणी मतमोजणीत फेरफार झाला असून, किमान २० ठिकाणी तर विजयी आणि पराभूत उमेदवारांच्या मतांत अगदी नगण्य फरक असल्याचे सांगत या ठिकाणांवर फेरमतमोजणी केली जावी, अशी मागणी तेजस्वी यांनी केली. रालोआला महाआघाडीपेक्षा केवळ १२ हजार २७० मतेच अधिक असल्याचा दावाही त्यांनी केला. 

काँग्रेसमध्ये नाराजीचे सूर
विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाणाऱ्या काँग्रेसमध्ये पुन्हा राहुल गांधी यांच्या नेतृत्वाविरोधात नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. पक्षातील वरिष्ठांना बाजूला ठेवत तसेच बिहारमधील नेत्यांना अडगळीत टाकत दिल्लीतून आयात केलेल्या नेत्यांकडे प्रचाराची धुरा सोपविण्यात आली. त्यामुळे पक्षाला राज्यात चमकदार कामगिरी करता आली नाही, अशी चर्चा पक्षात सुरू आहे. ७० जागा लढविण्याचा आग्रह धरणाऱ्या काँग्रेसला फक्त १९ जागांवरच विजय नोंदवता आला. पक्ष नेतृत्वाने जुन्याजाणत्या नेत्यांवर विश्वास न दर्शवता नवोदितांकडे सू्त्रे दिल्यामुळे बिहारमध्ये दारुण पराभव झाल्याची चर्चा पक्षात आहे. 

सर्व काही भाजपसाठीच : चिराग पासवान
निवडणुकीच्या तोंडावर रालोआतून बाहेर पडून सवतासुभा  मांडणाऱ्या लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी राज्यात भाजप प्रबळ व्हावा यासाठीच आम्ही या निवडणुकीत स्वतंत्र लढलो, अशी कबुली दिली आहे. विधानसभा निवडणुकीत सर्व जागांवर उमेदवार उभ्या करणाऱ्या लोक जनशक्ती पक्षाला केवळ एका जागेवर विजय मिळवता आला. मात्र, जदयुची मते खाण्याची महत्त्वाची भूमिका लोक जनशक्ती पक्षाने निभावली. आम्हाला आमचा पक्ष वाढविण्याचा हक्क असून, त्यासाठीच आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवली. आमचा मतहिस्सा वाढला असल्याचेही चिराग पासवान म्हणाले. 

नितीशकुमार नाराज?
पक्षाच्या खराब कामगिरीमुळे तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या जदयुचे नेते व मुख्यमंत्री नितीशकुमार नाराज असल्याचे समजते. अनेक जागांवर लोक जनशक्ती पक्षाने जदयुची मते खाल्ल्याने नितीशकुमार चिराग पासवान यांच्यावर खार खात असल्याचेही बोलले जात आहे. नाराज नितीशकुमार यांना भेटण्यासाठी गेलेल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी नितीशकुमारच मुख्यमंत्री असतील, असे ठासून सांगितले आहे.  दरम्यान, पक्षाच्या वाताहतीमुळे नितीशकुमार मुख्यमंत्रीपदासाठी फारसे उत्सुक नसल्याचे समजते. 

दिग्विजयसिंह यांचे आवाहन
काँग्रेसचे नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह यांनी नितीशकुमारांना तेजस्वी यादव यांना आशीर्वाद द्यावा, असे आवाहन केले आहे. नितीश यांनी भाजपच्या अमरवेलीला अधिक खतपाणी न घालता थेट महाआघाडीत सामील होऊन तेजस्वी यादव यांना आशीर्वाद द्यावा, अशा आशयाचे ट्वीट दिग्विजय यांनी केले आहे. मात्र, त्यावर जदयुची प्रतिक्रिया समजू शकलेली नाही.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: RJD strives for government formation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app