RJD-काँग्रेसने गरिबांच्या हक्कांवर डाका टाकला, जनावरांचा चारा खाणारे..; सीएम योगींचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 15:46 IST2025-11-04T15:46:22+5:302025-11-04T15:46:59+5:30
'भगवान रामाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा काँग्रेसचा राजपुत्र आता छठमैयावरही प्रश्न उपस्थित करतोय'

RJD-काँग्रेसने गरिबांच्या हक्कांवर डाका टाकला, जनावरांचा चारा खाणारे..; सीएम योगींचा घणाघात
समस्तीपूर : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज प्रचाराचा अखेरचा दिवस आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज भाजप उमेदवार राजेश कुमार सिंह यांच्या समर्थनार्थ मोहीउद्दीननगर येथे झालेल्या सभेतून विरोधकांवर तीव्र टीका केली. योगींनी राजद-काँग्रेस आघाडीवर हल्ला करताना म्हटले, “गरीबांच्या हक्कांवर डाका टाकणारे, जनावरांचा चारा खाणारे लोक बिहारचे भले कधीच करू शकत नाहीत. या लोकांनी बिहारला ‘जंगलराज’मध्ये ढकलले, अपहरण उद्योग चालवला, दंगे घडवले आणि नरसंहार केला.”
रामद्रोही आणि छठद्रोही विरोधक
योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले, “काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून म्हटले की, ‘राम अस्तित्वातच नव्हते’. राजदने रामरथ रोखला, तर समाजवादी पक्षाने रामभक्तांवर गोळ्या झाडल्या. हेच लोक आता छठमैयावर प्रश्न उपस्थित करत आहेत. अशा लोकांकडून ‘संस्कृतीचा आणि श्रद्धेचा अपमान’ होतो आणि बिहारच्या ओळखीला कलंक लागतो. 2005 पूर्वी राजद-काँग्रेसने युवकांच्या रोजगारावर डाका टाकला, गरीबांना मूलभूत सुविधा नाकारल्या. तेव्हा गरीब आजारी पडला की, उपचाराअभावी मरत असे. पशुधनाचा चारा खाणारे गरीबांचा कधी विचार करणार? त्यांनी जातीय सेना उभी करून नरसंहार करवले, अपहरण उद्योग फोफावला आणि महिलांच्या सुरक्षेची पायमल्ली केली.”
उत्तर प्रदेशचा बुलडोझर थांबणारा नाही
योगींनी समाजवादी पक्षावर टोला लगावत म्हटले, “उत्तर प्रदेशची जनता ज्यांना वारंवार नाकारते, तेच आता बिहारमध्ये भाषण देतात. आम्ही फक्त नावच नाही बदलले, आम्ही कामगिरीने उत्तर प्रदेशचs नाव पुन्हा जगाच्या नकाशावर आणलं आहे. अयोध्येत राममंदिर बांधले, काशी विश्वनाथ धाम उभारले, प्रयागराजचा भव्य महाकुंभ आयोजित केला. आता माफियांना चिरडण्यासाठी आमचा ‘बुलडोझर’ चालतो आणि त्यांच्या संपत्तीचा उपयोग गरीबांच्या कल्याणासाठी केला जातो,” अशी टीकाही योगींनी केली.
भाजपच्या कामाचे कौतुक
योगींनी स्पष्ट केले की, “उत्तर प्रदेशचा बुलडोझर थांबणार नाही, तो घाबरणारही नाही. बिहारलाही माफियांविरुद्ध तसाच निर्धार दाखवावा लागेल.” योगींनी एनडीए सरकारच्या विकासकामांची स्तुती करत सांगितले की, “एनडीएच्या काळात बिहारमध्ये वैद्यकीय शिक्षण संस्थांची संख्या वाढली आहे. आज बिहारमध्ये 41 हून अधिक वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालये कार्यरत आहेत. 12 कोटी गरीबांना स्वच्छ इंधन म्हणून मोफत गॅस कनेक्शन मिळाले, 4 कोटींना घरे, 3 कोटींना मोफत वीजकनेक्शन मिळाले.”
त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणावर भर देत सांगितले की, “1 कोटी 41 लाख मातांना व बहिणींना थेट आर्थिक मदत दिली गेली आहे. ही तर केवळ सुरुवात आहे. गुलामीचे अवशेष मिटवण्यासाठी आता मोहीउद्दीननगरचे नाव ‘मोहननगर’ करण्याच्या दिशेने पाऊल उचला. आम्ही फैजाबादचे नाव अयोध्या केले, इलाहाबादचे नाव प्रयागराज, हीच आमची विकास आणि वारशाचा सन्मानाची ओळख आहे.”