लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: २० अंश सेल्सिअसपेक्षा तापमान प्रत्येकी १ अंशाने वाढले की कामगारांची उत्पादनक्षमता २ ते ३ टक्क्यांनी घटते असे संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य आणि हवामान संस्थांनी काढलेल्या अहवालातून समोर आले आहे. मागील ५० वर्षांच्या अभ्यासावर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि जागतिक हवामान संघटना यांनी उष्णतेचे वाढते धोके कसे परिणाम करत आहेत याबाबतचा अभ्यास केला. जगभरात अति उष्णतेच्या घटना अधिक वेळा घडत असून, त्या आणखी तीव्र झाल्या आहेत.
२०२४ हे वर्ष आतापर्यंतचे सर्वांत उष्ण वर्ष ठरले आहे. ४० ते ५० अंश सेल्सियस तापमान सामान्य होत चाललेय. ४ अब्ज लोकसंख्या या दुष्परिणामांना तोंड देत आहे.
कोणते आजार वाढले? :उष्माघात, शरीरातील पाण्याची कमतरता, मेंदू आणि मूत्रपिंडाचे विकार असे आजार वाढत आहेत. त्यामुळे कामगारांचे आरोग्य, आर्थिक सुरक्षितता धोक्यात येते, असे अभ्यासात म्हटले आहे.
अहवालात काय?
- कामाच्या ठिकाणी उष्णतेच्या धोक्यांवर उपाय करावेत.
- मध्यमवयीन व वृद्ध कामगार यांना विशेष संरक्षण द्यावे.
- आजारांबाबत जागरूकता.
- तापमानाचा गरीब वर्गाला सर्वाधिक फटका बसतो. त्यांच्याकडे तोंड देण्यासाठी साधनंही कमी असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी उपाययोजना.
कामगारांवर होणारा उष्णतेचा परिणाम हे एक गंभीर व्यावसायिक संकट बनले आहे. सांस्कृतिक शहाणपण आणि आर्थिक न्याय दुर्लक्षित केले गेले, तर हवामान बदलाशी जुळवून घेण्याच्या योजना अपयशी ठरतील. गर्भवती महिला जास्त उष्णतेत काम करत असतील, तर त्यांना गर्भपात होण्याचा धोका दुप्पट असतो.- विद्या वेणुगोपाल, अहवालाच्या लेखिका
महाराष्ट्रात सर्वाधिक बळी
उष्माघातामुळे महाराष्ट्रात सर्वाधिक १७ जणांचा मृत्यू झाला. तर, उत्तर प्रदेश व तेलंगणा (१५-१५) या राज्यांत सर्वाधिक मृत्यू झाले. गुजरातमध्ये १० जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला. जास्तीत जास्त बाधित हे वृद्ध, उन्हात काम करणारे कामगार, शेतकरी यांचा समावेश आहे. ८४ जणांचा हीटस्ट्रोकमुळे फेब्रुवारी ते जुलै २०२५ या काळात मृत्यू झाला. ८,१७१ जणांचा उष्माघाताने २०१५-२०२२ या कालावधीत मृत्यू झाल्याचा दावा एनसीआरबीने केला.