इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाचा उदय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 05:51 IST2019-03-20T05:51:17+5:302019-03-20T05:51:50+5:30
महाराष्ट्रात ४५ जागा होत्या. त्यापैकी ४२ जागा काँग्रेसने जिंकून बालेकिल्ला पुन्हा सांभाळला. नागपुरातून फॉरवर्ड ब्लॉकचे जांबुवंतराव धोटे, राजापुरात प्रा. मधू दंडवते विजयी झाले होते. पंढरपूरमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या गवई गटाचे निवृत्ती कांबळे विजयी झाले.

इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाचा उदय!
- वसंत भोसले
महाराष्ट्रात ४५ जागा होत्या. त्यापैकी ४२ जागा काँग्रेसने जिंकून बालेकिल्ला पुन्हा सांभाळला. नागपुरातून फॉरवर्ड ब्लॉकचे जांबुवंतराव धोटे, राजापुरात प्रा. मधू दंडवते विजयी झाले होते. पंढरपूरमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या गवई गटाचे निवृत्ती कांबळे विजयी झाले. त्यांची काँग्रेसशी आघाडीच होती. महाराष्ट्राशिवाय उत्तर प्रदेश ८५ पैकी ७३, कर्नाटक २७ पैकी सर्व जागा, आंध्र, बिहार, राजस्थान, आदी राज्यांत काँग्रेसने प्रचंड यश मिळविले.
लोकसभेची पाचवी निवडणूक मार्च, १९७१ मध्ये झाली. लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर काँग्रेसच्या नेतृत्वासाठी आणि पंतप्रधानपदासाठी संघर्ष सुरू झाला होता. नेता निवडीच्यावेळी इंदिरा गांधी विरुद्ध मोरारजी देसाई अशी लढत झाली. त्यात इंदिरा गांधी विजयी झाल्या. मात्र, अंतर्गत धुसफूस काही संपली नाही. अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशन १९६९मध्ये बंगलोरमध्ये घेण्यात येणार होते. त्याच्या अध्यक्षपदी कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री एस. निजलिंगाप्पा होते. या अधिवेशनावर इंदिरा गांधी यांना मानणाऱ्या गटाने बहिष्कारच घातला. पंतप्रधानपदी असणाऱ्या इंदिरा गांधी यांनाच काँग्रेसमधून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. काँग्रेस पक्षात मोठीच फूट पडली.
काँग्रेस कार्यकारिणीच्या ७०७ सदस्यांपैकी ४१८ सदस्यांनी इंदिरा गांधी यांचे नेतृत्व स्वीकारले. लोकसभा व राज्यसभेच्या केवळ ३१ खासदारांनी मूळ काँग्रेसमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. उर्वरित सर्वच खासदारांनी इंदिरा गांधी यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतल्याने पक्षातून काढून टाकले असले तरी त्यांचे पंतप्रधानपद कायम राहिले. मोरारजी देसाई व एस. निजलिंगप्पा यांना तामिळनाडूचे ज्येष्ठ नेते के. कामराजही मिळाले होते.
इंदिरा गांधी यांनी अखिल भारतीय काँग्रेसची नव्याने स्थापना केली. या दोन्ही गटांना सिंडीकेट काँग्रेस व इंडिकेट काँग्रेस असे म्हटले जाऊ लागले. सिंडीकेट काँग्रेस ऊर्फ संघटना काँग्रेसने पाचव्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसविरोधात महागठबंधन केले. त्यात जनसंघ, प्रजा समाजवादी पक्ष, संयुक्त समाजवादी पक्ष व स्वतंत्र पक्ष सामील झाला होता.
दरम्यानच्या काळात इंदिरा गांधी यांनी अनेक धडाडीचे निर्णय घेऊन ‘गरिबी हटाव’चा नारा दिला. बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण केले. आपला पक्ष गरिबांच्या कल्याणासाठी झटणारा आहे, अशी प्रतिमा उभी करण्यात त्या यशस्वी झाल्या. मार्च १९७१ मध्ये निवडणुका जाहीर झाल्या. इंदिरा गांधी यांना नेतृत्व सिद्ध करायची ही पहिलीच वेळ होती.
त्यांनी देशव्यापी दौरे करून संघटना काँग्रेस आणि चार प्रमुख विरोधी पक्षांच्या महागठबंधनावर जोरदार टीकास्त्र चालविले. विरोधकांनी बिगरकाँग्रेसवादाचे तत्त्वज्ञान मांडले. त्यात काँग्रेस विचाराधारा, संघाची विचारसरणी असलेले जनसंघवाले, समाजवादी विचाराचे दोन्ही पक्ष एकत्र येऊ नही त्या सर्वांचा निवडणुकीत धुव्वा उडाला. लोकसभेच्या ५१८ जागा होत्या. त्यापैकी काँग्रेसने ४४१ जागा लढवून ३५२ जागांवर विजय संपादन केला. काँग्रेसला ४३.६८ टक्के मते मिळाली.
एकूण २७ कोटी ४१ लाख ८९ हजार १३२ मतदार या निवडणुकीत होते. त्यापैकी ५५.४७ टक्के मतदान झाले होते. संघटना काँग्रेसने २३८ जागा लढविल्या होत्या, मात्र त्यांना केवळ सोळा जागा मिळाल्या. त्यापैकी निम्म्या जागा गुजरातमधील होत्या. संघटना काँग्रेसचे नेते मोरारजी देसाई सुरतमधून विजयी झाले होते. जनसंघाने १५७ जागा लढविल्या आणि २२ जिंकल्या. अटलबिहारी वाजपेयी ग्वाल्हेरमधून निवडून आले. प्रजा समाजवादी पक्षाला केवळ दोन , तर संयुक्त समाजवादी पक्षाला तीन आणि स्वतंत्र पक्षाला आठ जागा मिळाल्या. या महागठबंधनाला एकूण ५१ जागा मिळाल्या.
याउलट भारतीय कम्युनिस्ट पक्षाने ४३, तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने २५ जागा जिंकल्या होत्या. तामिळनाडूमध्ये द्रमुकने २३ जागा मिळविल्या. इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वापुढे विरोधकांचा अक्षरश: पालापाचोळा झाला. या निवडणुकीने इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तबच झाले.
या निवडणुकीतील इंदिरा गांधी यांचा ‘गरिबी हटाव’चा नारा गाजला होता. त्यांच्या पक्षाला गायवासरू चिन्ह मिळाले होते. ‘गाय वासरू, नका विसरू’ ही घोषणा गाजली होती.
(उद्याच्या अंकात - आणीबाणीचा भारतीय लोकशाहीवरील डाग!)