कोलकत्याच्या 'निर्भया'ला मिळाला न्याय; आरजी कर प्रकरणातील नराधमाला जन्मठेपेची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 15:46 IST2025-01-20T15:43:18+5:302025-01-20T15:46:07+5:30

RG Kar Rape-Murder Case: महिला डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणातील आरोपी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

RG Kar rape-murder case; The 'murderer' finally sentenced to life imprisonment | कोलकत्याच्या 'निर्भया'ला मिळाला न्याय; आरजी कर प्रकरणातील नराधमाला जन्मठेपेची शिक्षा

कोलकत्याच्या 'निर्भया'ला मिळाला न्याय; आरजी कर प्रकरणातील नराधमाला जन्मठेपेची शिक्षा

RG Kar Rape-Murder Case: पश्चिम बंगालच्या सियालदह न्यायालयाने आज(20 जानेवारी) कोलकाता आरजी कर बलात्कार-हत्या प्रकरणातील दोषी संजय रॉय (Sanjay Roy) ला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच न्यायालयाने त्याला 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. शिक्षेची घोषणा करताना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिर्बन दास म्हणाले की, हे दुर्मिळ प्रकरण नाही, त्यामुळे ते दोषीला जन्मठेपेची शिक्षा देत आहेत. 

भारतीय न्याय संहितेच्या कलम 64, 66 आणि 103 (1) अंतर्गत संजय रॉय दोषी आढळला आहे. या कलमांतर्गत गुन्हेगाराला जास्तीत जास्त फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा देण्याची तरतूद आहे. मात्र न्यायाधीशांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर न्यायालयाने राज्य सरकारला पीडितेच्या कुटुंबीयांना 17 लाख रुपयांची भरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत. यावर पीडितेच्या पालकांनी भरपाई घेण्यास नकार दिला. 

पीडितेच्या पालकांनी केलेली फाशीची मागणी 
पीडितेच्या पालकांकडून उपस्थित राहिलेल्या वकिलानेही जास्तीत जास्त शिक्षेची मागणी केली होती. संजय रॉय हा सिव्हिक व्हॉलंटियर असल्याने हॉस्पिटलच्या सुरक्षेची जबाबदारी त्याच्याकडे होती. पण त्याने सुरक्षा करण्याऐवजी पीडितेसोबत जघन्य गुन्हा केला आहे, त्यामुळे त्याला जास्तीत जास्त(फाशी) झाली पाहिजे, असा युक्तिवाद वकिलांनी केला. पण, न्यायालयाने सुनावणीअंती आरोपीला जन्मठेप सुनावली आहे.

सुमारे 162 दिवसांनी निर्णय
2024 मध्ये 8-9 ऑगस्टच्या रात्री घडलेल्या या घटनेच्या सुमारे 162 दिवसांनंतर न्यायालयाने शनिवारी आपला निर्णय दिला आणि संजय रॉय यांना दोषी ठरवले. या प्रकरणाची सुनावणी सुमारे 57 दिवस चालली. यापूर्वी या प्रकरणाचा तपास कोलकाता पोलिस करत होते. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. सीबीआयने 13 ऑगस्ट रोजी या प्रकरणाचा तपास हाती घेतला. सीबीआयने 120 हून अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदवले. सुमारे दोन महिने या प्रकरणी कॅमेरा ट्रायल सुरू होती.

त्याला फाशी द्या ; आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
संबंधित प्रकरणातील आरोपी संजय रॉयला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया रविवारी आरोपीच्या आईने दिली. मुलाला फाशीची शिक्षा झाली, तरी माझा त्याला आक्षेप नसेल. कारण त्याचा गुन्हा सिद्ध झाला आहे. मी एकट्याने रडेन, माझे नशीब समजून सर्व गोष्टींचा स्वीकार करेन. एक महिला व तीन मुलींची आई असल्याने मी त्या पीडितेच्या मातेचे दु:ख समजू शकते, असे नमूद करत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. 
 

 

Web Title: RG Kar rape-murder case; The 'murderer' finally sentenced to life imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.