Reuters X Handle Block: आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था रॉयटर्सचे अधिकृत @Reuters X (पूर्वीचे ट्विटर) हँडल भारतात ब्लॉक झाले आहे. यामुळे पत्रकारिता आणि डिजिटल स्वातंत्र्याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहेत. यावरन आता भारत सरकारने एक निवेदन जारी केले आहे. केंद्र सरकारने म्हटले आहे की, आम्ही हे एक्स हँडल ब्लॉक करण्याबाबत कोणताही आदेश दिलेला नाही.
निवेदनात म्हटले की, "भारत सरकारला रॉयटर्सचे हँडल ब्लॉक करण्याची गरज नाही. सरकारने याबाबत कुठलेही निर्देश दिलेले नाहीत. ही समस्या सोडवण्यासाठी आम्ही X सोबत सतत संपर्कात आहोत." दरम्यान, आज(रविवार) सकाळपासून रॉयटर्सच्या एक्स हँडलवर "कायदेशीर विनंतीला प्रतिसाद म्हणून हे खाते भारतात बंद करण्यात आले आहे," असा मेसेज येत आहे.
पीटीआयने सरकारी सूत्रांचा हवाला देत सांगितले की, ऑपरेशन सिंदूर दरम्यान ७ मे रोजी एक आदेश जारी करण्यात आला होता, परंतु तो अंमलात आणला गेला नाही. आता X ने कदाचित चुकून तो जुना आदेश अंमलात आणला असावा. ही बाब समोर आल्यानंतर सरकारने ताबडतोब X शी संपर्क साधून हा ब्लॉक काढून टाकण्यास सांगितले आहे.
विशेष म्हणजे, रॉयटर्स टेक न्यूज, रॉयटर्स फॅक्ट चेक, रॉयटर्स एशिया आणि रॉयटर्स चायना सारखे हँडल अजूनही भारतात सुरू आहेत. मात्र, मुख्य रॉयटर्स अकाउंट आणि रॉयटर्स वर्ल्ड हँडल भारतात ब्लॉक झाले आहे.