पाकिस्तानी गुप्तहेरांच्या संपर्कात; आसाममध्ये भारतीय हवाई दलाचा सेवानिवृत्त अधिकारी अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 23:28 IST2025-12-13T23:28:24+5:302025-12-13T23:28:37+5:30
पाकिस्तानी गुप्तहेरांशी संबंधाच्या आरोपाखाली वायुदलाच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याला अटक

पाकिस्तानी गुप्तहेरांच्या संपर्कात; आसाममध्ये भारतीय हवाई दलाचा सेवानिवृत्त अधिकारी अटक
पाकिस्तानी हेरांशी संबंध असल्याचा आरोप असलेल्या एका निवृत्त हवाई दलाच्या कर्मचाऱ्याला आसाममध्ये अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर पाकिस्तानी हेरांना संरक्षणाशी संबंधित कागदपत्रे पुरवल्याचा आरोप आहे. भारतीय हवाई दलाचे सेवानिवृत्त अधिकारी कुलेंद्र शर्मा यांना गंभीर आरोपाखाली आसामच्या तेजपूर येथून अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे देशाच्या सुरक्षेसंबंधी गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कुलेंद्र शर्मा हे २००२ मध्ये भारतीय वायुदलातून कनिष्ठ वॉरंट अधिकारी पदावरून निवृत्त झाले होते. त्यांच्यावर अनेक गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारताच्या सार्वभौमत्व, एकता आणि अखंडतेला धोका निर्माण करणे, भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारणे, गुन्हेगारी कट रचणे, गुन्ह्याचे पुरावे नष्ट करणे ही कलमं त्यांच्यावर लावण्यात आली आहेत.
गोपनीय कागदपत्रे पुरवल्याचा संशय
सोनितपूर जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक हरिचरण भुमिज यांनी सांगितले की, एका विश्वसनीय सूत्राकडून कुलेंद्र शर्मा पाकिस्तानी गुप्तचर ऑपरेटिव्ह्सच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाल्यावर त्यांना अटक करण्यात आली. प्राथमिक तपासानुसार, शर्मा यांनी संरक्षण-संबंधित काही गोपनीय कागदपत्रे अज्ञात व्यक्तींसोबत सामायिक केल्याचे दिसून आले आहे.
पोलिसांनी शर्मा यांच्याकडून एक लॅपटॉप आणि एक मोबाईल फोन जप्त केला आहे. हे दोन्ही उपकरणे पुढील फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत, ज्यामुळे अधिक माहिती मिळण्याची अपेक्षा आहे. दिलेली माहिती अत्यंत गोपनीय स्वरूपाची असल्याचे संकेत मिळाले आहेत. हे दस्तऐवज त्यांनी कोणासोबत आणि कोणत्या उद्देशाने दिले, तसेच त्यांची सत्यता काय आहे, याबद्दल पोलीस तपास करत आहेत.
अरुणाचलमध्येही चार संशयित जासूस अटकेत
कुलेंद्र शर्मा यांच्या अटकेपूर्वी अरुणाचल प्रदेश पोलिसांनी देखील याच प्रकारच्या देशविरोधी कारवायांसाठी चार संशयित जासूसांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले सर्व संशयित जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा येथील रहिवासी आहेत. हे संशयित टेलीग्राम चॅनलच्या माध्यमातून पाकिस्तानी हँडलर्सना भारतीय सशस्त्र दलाची तैनाती आणि हालचालींशी संबंधित सुरक्षा-संबंधित माहिती पाठवत असल्याचा पोलिसांना संशय आहे. या चारही आरोपींना राजधानी ईटानगर, पश्चिम सियांग आणि चांगलांग जिल्ह्यासह अरुणाचल प्रदेशातील वेगवेगळ्या भागातून अटक करण्यात आली आहे.
माजी हवाई दल अधिकारी आणि काश्मीरमधील संशयित गुप्तहेरांच्या अटकेमुळे देशाच्या सीमावर्ती भागातील सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून, गुप्तहेरांविरोधात सखोल तपासणी सुरू आहे.