डॉक्टर दाम्पत्य 12 दिवस डिजिटल अरेस्ट; CBI अधिकारी असल्याचे भासवून 2 कोटी रुपये लुटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 20:19 IST2025-06-05T20:18:28+5:302025-06-05T20:19:14+5:30
या प्रकरणाचा तपास सायबर पोलिस करत आहेत.

डॉक्टर दाम्पत्य 12 दिवस डिजिटल अरेस्ट; CBI अधिकारी असल्याचे भासवून 2 कोटी रुपये लुटले
Digital Arrest: गेल्या काही काळापासून डिजिटल अरेस्टच्या अनेक घटना घडत आहेत. पोलिस आणि सरकार सातत्याने याबाबत लोकांना जागरुक करत आहेत. पण, तरीदेखील अनेकजण या यासबर ठगांच्या जाळ्यात अडकून आपले मोठे आर्थिक नुकसान करुन घेतात. आता ताजी घटना बिहारची राजधानी पाटणा येथून समोर आली आहे. एका निवृत्त डॉक्टर जोडप्याला सायबर आरोपींनी १२ दिवस डिजिटल अटकेत ठेवले अन् तब्बल १ कोटी ९५ लाख रुपये लुटले.
मिळालेल्या माहितीनुसार, पाटणातील हनुमान नगर भागात राहणाऱ्या निवृत्त डॉक्टर जोडप्याला १२ दिवस घरात डिजिटल अरेस्ट करण्यात आले होते. सायबर गुन्हेगारांनी बनावट सीबीआय अधिकारी, न्यायाधीश आणि वकील असल्याचे भासवून या जोडप्याकडून १ कोटी ९५ लाख रुपय लुटले. आपली फसवणूक झाल्याचे समजताच या जोडप्याने सायबर पोलिस ठाण्यात लेखी अर्ज दिला. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
अशा प्रकारे फसवले
डिजिटल अटकेचे बळी ठरलेले डॉ. राधे मोहन प्रसाद यांचे पुत्र डॉ. सौरभ यांनी सांगितले की, २१ मे रोजी त्यांचे वडील डॉ. राधे मोहन प्रसाद यांना मुंबईहून एक फोन आला. फोन करणाऱ्याने स्वतःला सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून, मुंबईच्या कुलाबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची भीती घातली. यानंतर, फोन करणाऱ्याने वडिलांना कुलाबा पोलिस ठाण्याचा नंबर दिला. वडिलांनी फोन केला असता, डॉ. राधा मोहन प्रसाद यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले.
१ कोटी ९५ लाख रुपये ट्रान्सफर केले
त्या लोकांनी व्हिडिओ कॉल देखील केला, ज्यामध्ये पोलिसांच्या गणवेशातील लोकही होते. सायबर गुन्हेगारांनी अटकेची भीती दाखवून डॉक्टर दाम्पत्याला आपल्या जाळ्यात ओढले. तुम्ही पैसे पाठवले नाहीत तर तुम्हाला अटक केली जाईल, अशी धमकी दिली. घाबरलेल्या दाम्पत्याने सहा वेळा आरटीजीएसद्वारे १ कोटी ९५ लाख रुपये आरोपींच्या खात्यात ट्रान्सफर केले. मात्र, पैसे ट्रान्सफर झाल्यानंतर जोडप्याला त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सायबर पोलिस ठाण्याला संपूर्ण प्रकरणाची लेखी माहिती दिली.