पश्चिम बंगाल भाजपमध्ये फेरबदल; विजयवर्गीय यांचे छाटले पंख
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 07:26 IST2020-10-31T04:21:37+5:302020-10-31T07:26:06+5:30
BJP west Bengal : विजयवर्गीय यांना प. बंगालऐवजी मध्यप्रदेशात अधिक लक्ष देण्यास सांगितले आहे. या फेरबदलासोबत केंद्रीय नेतृत्वाने प. बंगाल प्रदेश भाजपची सूत्रे हाती घेतल्याचे संकेत दिसतात.

पश्चिम बंगाल भाजपमध्ये फेरबदल; विजयवर्गीय यांचे छाटले पंख
कोलकाता : पश्चिम बंगाल प्रदेश भाजपमधील अंतर्गत कलह दूर करण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाने अनेक संघटनात्मक बदल केले आहेत. एक दिवसापूर्वीच प्रदेश भाजपच्या सरचिटणीसपदी (संघटना) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक अमित चक्रवर्ती यांची नियुक्ती करून राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांचे पंख छाटले, तसेच विजयवर्गीय यांना प. बंगालऐवजी मध्यप्रदेशात अधिक लक्ष देण्यास सांगितले आहे. या फेरबदलासोबत केंद्रीय नेतृत्वाने प. बंगाल प्रदेश भाजपची सूत्रे हाती घेतल्याचे संकेत दिसतात.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मिळालेला जनाधार न गमावण्याची आणि अंतर्गत कलह संपुष्टात आणणे, हा भाजपचा हेतू आहे. प्रदेश भाजप अध्यक्ष दिलीप घोष आणि मुकुल रॉय गटातील वाढत्या कलहामुळे विधानसभेच्या आगामी निवडणुकीत पक्षाचे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्रीय नेतृत्वाने प्रदेश भाजपमध्ये मोठे फेरबदल केले, असे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले. दिलीप घोष यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे सुब्रतो चट्टोपाध्याय यांच्या जागी चक्रवर्ती यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.