प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 15:17 IST2025-11-03T15:15:18+5:302025-11-03T15:17:53+5:30
Asim Sarode News: राज्यातील प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आली आहे. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी सरोदे यांची सनद निलंबित करण्याचा हा निर्णय घेतला आहे.

प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
राज्यातील प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आली आहे. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी सरोदे यांची सनद निलंबित करण्याचा हा निर्णय घेतला आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमामधून न्यायव्यवस्थेसह विधानसभा अध्यक्ष आणि राज्यपालांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने विवेकानंद घाटगे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सरोदे यांच्यावर ही कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
एका कार्यक्रमात बोलताना असिम सरोदे यांनी‘’आज भारतातील न्यायव्यवस्था ही सरकारच्या दबावाखाली आहे. त्यामुळे सरकारच्या बाजूने निकाल दिले जात आहेत’’, असा दावा केला होता. त्याबरोबरच राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांबाबतही वादग्रस्त शब्दांचा वापर केला होता. त्यामुळे एका तक्रारदाराने असिम सरोदे यांच्या या विधानांची बार कौन्सिलकडे तक्रार केली होती.
या प्रकरणी तक्रारदाराने असिम सरोदे यांना १९ मार्च २०२४ रोजी लेखी माफी मागून विषय संपवण्याची संधी दिली होती. मात्र ही संधी सरोदे यांनी नाकारली होती. त्यानंतर तक्रारदाराने समोरे यांची सनद रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली होती. दरम्यान, अॅडव्होकेट विवेकानंध घाटगे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने दृकश्राव्य पुराव्यांची पडताळणी केली. त्यात सरोदे हे ‘राज्यपाल फालतू आहेत’, ‘न्यायव्यवस्था ही सरकारच्या दबावाखाली आहे’, अशी विधानं करताना दिसत आहेत. सरोदेंनी केलेल्या या वक्तव्यांमुळे नागरिकांमध्ये न्यायालयांबाबत अविश्वास निर्माण होऊ शकतो, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता. अखेरीस सर्व बाबी विचारात घेत बार कौन्सिलने असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.