आपचा कुमार विश्वास यांना दणका, राजस्थानच्या प्रभारी पदावरून हटवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2018 14:14 IST2018-04-11T14:14:03+5:302018-04-11T14:14:03+5:30
गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज असलेल्या कुमार विश्वास यांना आपने दणका दिला आहे. पक्षाने कुमार विश्वास यांना राजस्थानच्या प्रभारीपदावरून हटवले असून, दीपक वाजपेयी यांची पक्षाचे नवे राजस्थान प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे.

आपचा कुमार विश्वास यांना दणका, राजस्थानच्या प्रभारी पदावरून हटवले
नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज असलेल्या कुमार विश्वास यांना आपने दणका दिला आहे. पक्षाने कुमार विश्वास यांना राजस्थानच्या प्रभारीपदावरून हटवले असून, दीपक वाजपेयी यांची पक्षाचे नवे राजस्थान प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. या निर्णयामुळे आधीच पक्षात एका बाजूला पडलेले कुमार विश्वास आता केवळ पक्षाचे संस्थापक सदस्य उरले आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यासोबत कुमार विश्वास यांचे उघड मतभेत आहेत. त्यामुळे पक्षाने त्यांना नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी सुद्धा दिली नव्हती. इतकेच नाही तर अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये त्यांना डावलून पक्षाच्यावतीने बोलण्याची संधीसुद्धा देण्यात आली नव्हती.
या वर्षाच्या अखेरीस राजस्थानमध्ये विधानसभा निवडणूक होणार असून, या निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने कंबर कसली आहे. दरम्यान, बुधवारी आपचे नेते आणि माजी पत्रकार आशुतोष यांनी कुमार विश्वास यांना आपच्या राजस्थान प्रभारी पदावरून हटवण्यात आल्याची घोषणा केली. कुमार विश्वास यांच्याकडे पक्षासाठी फारसा वेळ उपलब्ध नसतो. त्यामुळे त्यांना पक्षाच्या प्रभारीपदावरून हटवण्यात आले आहे, असे आशुतोष यांनी सांगितले.
कुमार विश्वास यांच्या जागी राजस्थान प्रभारीपदी नियुक्त करण्यात आलेले दीपक वाजपेयी हे आपमधील चर्चित चेहऱ्यांपैकी नाहीत. मात्र त्यांना अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय मानले जाते. ते पक्षाचे कोषाध्यक्ष असून, आपचे सर्वोच्च कार्यकारिणी संस्था असलेल्या पॉलिटिकल अफेअर्स कमिटीचे ते सदस्य आहेत.