जिओचा धमाका; आता 199 रूपयांत 25 जीबी डेटा, आठ आण्यात इंटरनॅशनल कॉल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2018 20:40 IST2018-05-10T20:30:18+5:302018-05-10T20:40:53+5:30
रिलायन्स जिओच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये झिरो टच सेवा, नॅशनल रोमिंग, इंटरनॅशनल कॉलिंग आणि रोमिंग या सुविधांसाठी आकर्षक असे पर्याय देण्यात आले आहेत.

जिओचा धमाका; आता 199 रूपयांत 25 जीबी डेटा, आठ आण्यात इंटरनॅशनल कॉल
मुंबई: आतापर्यंत ग्राहकांना आकर्षक दरांमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या रिलायन्स जिओने पोस्टपेड सेवेची घोषणा करण्यात आली. या सेवेसाठी येत्या 15 तारखेपासून नोंदणीला सुरूवात होणार आहे. रिलायन्स जिओच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये झिरो टच सेवा, नॅशनल रोमिंग, इंटरनॅशनल कॉलिंग आणि रोमिंग या सुविधांसाठी आकर्षक असे पर्याय देण्यात आले आहेत. त्यामुळे जिओच्या पूर्वीच्या इंटरनेट सेवेप्रमाणेच या पोस्टपेड प्लॅनवर ग्राहकांच्या उड्या पडण्याचा अंदाज आहे.
या प्लॅनमधील झिरो टच फिचरअंतर्गत जिओचा पोस्टपेड प्लॅन घेणाऱ्यांच्या पूर्वीच्या सेवाही तशाच सुरू राहणार आहेत. यामध्ये व्हॉईस, इंटरनेट, एसएमएस आणि इंटरनॅशलन कॉलिंग या सुविधांचा समावेश असेल.
199 रूपयांच्या या पोस्टपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना महिन्याला 25 जीबी डेटा मोफत मिळणार आहे. याशिवाय, या ग्राहकांना जिओची सर्व अॅप्स मोफत वापरता येतील. याशिवाय, इंटरनॅशनल कॉलसाठी प्रतिमिनिट 50 पैसे इतका माफक दर आकारला जाणार आहे. सध्याच्या बाजारपेठेतील एअरटेल आणि व्होडाफोन या दोन मुख्य स्पर्धकांच्या तुलनेत जिओचा पोस्टपेड प्लॅन कमालीचा स्वस्त आहे. त्यामुळे दूरसंचार क्षेत्रातील स्पर्धा आणखीनच तीव्र होण्याची शक्यता आहे.