हल्लीच्या बदलेल्या नातेसंबंधांमध्ये नात्यात दुरावा येणं, घटस्फोट होणं ही सामान्य बाब बनली आहे. क्वचित प्रसंगी कोर्टकचेरीपर्यंत पोहोचलेले पती-पत्नीमधील वाद मिटून त्यांचा पुन्हा एकदा सुरळीत झाल्याचंही दिसतं, अशीच एका महिलेच्या अजब लग्नांची गजब कहाणी समोर आली आहे. जवळपास पाच वर्षे चाललेल्या कोर्टकचेरीनंतर कायदेशीर लढाई संपुष्टात आणत सदर महिला आणि तिच्या पहिल्या पतीने पुन्हा एकदा लग्नगाठ बांधल्याचं समोर आलं आहे. या घटस्फोटित जोडप्याने लोक अदालतीमध्ये प्रकरण मिटवत कायदेशीर लढाई संपवली आणि कोर्टातच पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सदर महिलेने पहिल्या पतीला सोडून प्रेमविवाह केला होता. मात्र तिने आपण विवाहित असल्याची बाब तिच्या दुसऱ्या पतीपासून लपवली होती. जेव्हा हे गुपित उलगडलं तेव्हा त्यांच्यामध्ये वाद सुरू झाला. तसेच प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचलं. त्यानंतर सदर महिलेने पहिल्या पतीला घटस्फोट दिला नसल्याचा मुद्दा अधोरेखित करत कोर्टाने हा विवाह बेकायदेशीर ठरवला. दुसरीकडे या महिलेचा पहिल्या पतीसोबत घटस्फोटही झाला.
यादरम्यान, या महिलेला दुसऱ्या पतीपासन एक मुलही झालं होतं. सदर महिलेने तिच्या पहिल्या पतीविरोधात पोटगीसाठी कोर्टात खटला दाखल केला होता. त्याबाबत कोर्टामध्ये अनेकदा सुनावणी झाली. यादरम्यान, या दोघांमध्ये पुन्हा एकदा बोलणं सुरू झालं. ते व्हॉट्सअॅपवर एकमेकांशी बोलू लागले. तसेच या पाच वर्षांच्या कोर्टकचेरीनंतर त्यांच्यातील जवळीक वाढू लागली.
कोर्टातील केससाठी कोर्टात वारंवार होणाऱ्या भेटीगाठींमुळे त्यांच्यातील जुन्या आठवणी जाग्या झाल्या. दरम्यान, हे प्रकरण लोकन्यायालयासमोर आला. तिथे दोघांचंही समुपदेशन करण्यात आलं. त्यानंतर या दोघांनीही पुन्हा एकदा एकत्र येण्याचा निर्णय घेतला. मग लोकन्यायालयानेही त्यांना विधिपूर्वक विवाह करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर हे दोघेही सप्तपदी घेत विवाहबद्ध झाले.