Rekha Gupta News: दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदासाठी भाजप कोणाची निवड करणार, याची निवडणुकीचे निकाल लागल्यापासून चर्चा होती. अखेर रेखा गुप्ता यांची दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदासाठी वर्णी लागली आहे. रेखा गुप्ता यांची निवड करत भाजपने राजस्थानातील राजकीय निर्णयाची पुनरावृत्ती केली आहे. दिल्लीमधील शालीमार बाग विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या रेखा गुप्ता दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री ठरल्या आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
राजस्थान विधानसभेचे निकाल लागल्यानंतर अनेक नेत्यांची नावे चर्चेत होती. पण, भाजपने नेहमीप्रमाणे धक्का दिला. पहिल्यांदाच आमदार बनलेल्या भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्री करण्यात आले. दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री ठरलेल्या रेखा गुप्ता याही पहिल्यांदाच आमदार बनल्या आणि त्यांच्या हाती थेट दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची सोपवण्यात आली आहेत.
तीन वेळा नगरसेवक आणि एकदा महापौर राहिलेल्या रेखा गुप्ता यांनी २०१५ आणि २०२० मध्येही विधानसभा निवडणूक लढवली होती. पण, त्यांना आपच्या वंदना कुमारी यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
यावेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत रेखा गुप्ता यांनी शालीमार बाग विधानसभा मतदारसंघातून २९ हजारांहून अधिक मताधिक्य घेत वंदना कुमारी यांचा पराभव करत परतफेड केली. पहिल्यांदाच आमदार म्हणून विधानसभेत पोहोचलेल्या रेखा गुप्ता यांना आता थेट मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली आहे.
विद्यार्थी नेता ते मुख्यमंत्री
रेखा गुप्ता यांचा राजकीय प्रवास विद्यार्थी राजकारणात सुरू झाला. १९९६-९७ मध्ये त्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी नेत्या बनल्या. २००७ मध्ये त्यांनी उत्तरी पीतमपुरा वार्डातून निवडणूक लढवली आणि नगरसेवक म्हणून निवडून आल्या. २०१२ मध्ये त्या पुन्हा नगरसेवक बनल्या.
रेखा गुप्ता या देशातील १८व्या महिला मुख्यमंत्री आहेत. तर भारतीय जनता पक्षाच्या पाचव्या महिला मुख्यमंत्री ठरल्या आहेत. त्यापूर्वी उमा भारती, सुषमा स्वराज, वसुंधरा राजे आणि आनंदीबेन पटेल या भाजपच्या वेगवेगळ्या राज्यात मुख्यमंत्री राहिल्या आहेत.