तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 06:58 IST2025-11-10T06:56:52+5:302025-11-10T06:58:57+5:30
Major Conspiracy of Terrorists Foiled: गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) देशात एरंडीच्या बियांपासून तयार केल्या जाणाऱ्या 'रिसिन' नामक विषाच्या माध्यमातून भयंकर हल्ला करण्याचा एक कट उधळून लावला.या कारवाईत चीनमध्ये एमबीबीएस केलेल्या एका डॉक्टरसह तिघांना अटक करण्यात आली आहे.

तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
अहमदाबाद - गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) देशात एरंडीच्या बियांपासून तयार केल्या जाणाऱ्या 'रिसिन' नामक विषाच्या माध्यमातून भयंकर हल्ला करण्याचा एक कट उधळून लावला.या कारवाईत चीनमध्ये एमबीबीएस केलेल्या एका डॉक्टरसह तिघांना अटक करण्यात आली आहे. या माध्यमातून एका संशयित दहशतवादी सिंडिकेटचा पर्दाफाश झाला आहे. या तिघांकडून तीन पिस्तूल, ३० काडतुसे आणि एरंडीचे चार लिटर तेल, तीन मोबाइल आणि दोन लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत.
अटक करण्यात आलेल्यांत डॉ. अहमद मोहियुद्दीन सय्यद, आझाद सुलेमान शेख व सुहेल मोहम्मद सलिम यांचा समावेश आहे. या तिघांनी लखनौ, दिल्ली व अहमदाबादमध्ये अनेक संवेदनशील ठिकाणांची रेकी केली होती. या कटातील म्होरक्या मध्य आशियातील खुरासान येथील 'इस्लामिक स्टेट' शी संबंधित आहे, अशी माहिती गुजरात एटीएसचे उपमहासंचालक सुनील जोशी यांनी दिली.
'एटीएस' नुसार, डॉ. सय्यद हा उच्चशिक्षित व कट्टरवादी असून मोठा दहशतवादी हल्ला करण्यासाठी आवश्यक पैसा उभा करणे आणि त्यासाठी तरुणांची भरती करण्याची योजना त्याने आखली होती. त्याचा खुरासान येथील म्होरक्या पाकिस्तानातून ड्रोनच्या माध्यमातून या टोळीला शस्त्रे पाठवत होता.
दोघे उत्तर प्रदेशातील
डॉ. सय्यद व्यतिरिक्त अन्य दोन आरोपी आझाद सुलेमान शेख व मोहम्मद सुहेल मोहम्मद सलीम उत्तर प्रदेशचे रहिवासी असून, त्यांना बनासकांठा जिल्ह्यातून अटक करण्यात आली.
या दोघांनी कथितरीत्या राजस्थानच्या हनुमानगडमधून शस्त्रे मिळवून ती डॉ. सय्यदला पुरवली होती. डॉ. सय्यद याला १७नोव्हेंबरपर्यंत एटीएस कोठडी सुनावण्यात आली आहे.
'सीडीआर'मधून माहिती बाहेर
या तिघांचे कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) आणि चौकशीतून बाहेर आलेल्या माहितीनुसार गेल्या एक वर्षापासून ते अनेक संवेदनशील शहरांची माहिती घेत होते. त्यांना मदत करणाऱ्या स्थानिकांची अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र, यांचा संबंध एखाद्या आंतरराष्ट्रीय टोळीशी आहे काय, याचा तपास सुरू आहे.
अशी झाली होती तयारी
या डॉक्टरने साथीदारांच्या मदतीने दहशतवादी हल्ला करण्यासाठी एरंडीच्या बियांवर रासायनिक संशोधन सुरू केले होते. यासाठी आवश्यक उपकरणे, कच्चा मालही जमा करून ठेवला होता. विष तयार करण्यासाठी आवश्यक प्रारंभीची रासायनिक प्रक्रियाही त्याने सुरू केली होती.
काय आहे रिसिन विष?
एरंडीच्या बियांवर प्रक्रिया झाल्यानंतर उरलेल्या कचऱ्यांतून हे भयंकर विष तयार केले जाते. हे विष पोटात गेले तर श्वासोच्छ्वासास त्रास, घशावर सूज येते. इंजेक्शनच्या माध्यमातून ते शरीरात गेले तर शारीरिक क्रियांवर गंभीर परिणाम होऊन ते अत्यंत घातक ठरते.
डॉ. सय्यदचे कारनामे
एटीएसच्या चौकशीत डॉ. सय्यदने दिलेल्या माहितीनुसार, भारतात हल्ला घडवून आणण्यासाठी त्याने गांधीनगर जिल्ह्यात कलोलमध्ये एका निर्मनुष्य जागी शस्त्रे जमवली होती.
त्यांचा म्होरक्या अबू खदिजा हा मूळ अफगाणिस्तानचा असून इस्लामिक स्टेटशी (खुरासान) संबंधित आहे. पाकिस्तानमधील अनेकांच्या तो संपर्कात होता.