एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 05:38 IST2025-04-28T05:38:28+5:302025-04-28T05:38:40+5:30
या आठवड्यात प्रसिद्ध झालेली नवीन पाठ्यपुस्तके नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) आणि शालेय शिक्षणासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रमाची रुपरेखा (एनसीएफएसई) २०२३ च्या अनुरूप तयार करण्यात आली आहेत.

एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
नवी दिल्ली : इयत्ता सातवीच्या एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांमधून मुघल आणि दिल्ली सल्तनत यांचे सर्व संदर्भ काढून टाकण्यात आले आहेत. तर, भारतीय राजघराणे, महाकुंभचे संदर्भ, 'मेक इन इंडिया' आणि 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' सारख्या सरकारी उपक्रमांचा समावेश नवीन अभ्यासक्रमात करण्यात आला आहे.
या आठवड्यात प्रसिद्ध झालेली नवीन पाठ्यपुस्तके नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) आणि शालेय शिक्षणासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रमाची रुपरेखा (एनसीएफएसई) २०२३ च्या अनुरूप तयार करण्यात आली आहेत. ज्यामध्ये शालेय शिक्षणात भारतीय परंपरा, ज्ञान प्रणाली व स्थानिक संदर्भ समाविष्ट करण्यावर भर दिला आहे.
एनसीईआरटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा पुस्तकांचा दुसरा भाग येत्या काही महिन्यांत अपेक्षित आहे. तथापि, त्यांनी वगळलेले भाग पुस्तकाच्या दुसऱ्या भागात कायम ठेवले जातील की नाही यावर भाष्य केले नाही.
‘जमीन कशी पवित्र होते’ या शीर्षकाचा धडा
एनसीईआरटीने यापूर्वी मुघल आणि दिल्ली सल्तनतवरील धडे छोटे केले होते. सामाजिक विज्ञान पाठ्यपुस्तकात मगध, मौर्य, शुंग आणि सातवाहन यासारख्या प्राचीन भारतीय राजघराण्यांवर नवीन प्रकरणे आहेत.
पुस्तकात आणखी नवीन भर म्हणजे "जमीन कशी पवित्र होते" हे शीर्षक असलेला धडा आहे. इस्लाम, ख्रिश्चन, यहुदी, पारसी, हिंदू, बौद्ध आणि शीख धर्म यासारख्या धर्मांसाठी पवित्र मानली जाणारी भारत आणि बाहेरील ठिकाणे आणि तीर्थक्षेत्रांवर यात भाष्य करण्यात आले आहे.
यात 'पवित्र भूगोल' सारख्या संकल्पनांचा समावेश आहे, ज्यामध्ये १२ ज्योतिर्लिंगे, चार धाम यात्रा आणि शक्तीपीठे यासारख्या ठिकाणांचा तपशील आहे. पाठ्यपुस्तकात असा दावा आहे की वर्ण-जातीय व्यवस्थेने सामाजिक स्थिरता प्रदान केली होती परंतु नंतर ती कठोर झाली, विशेषतः ब्रिटिश राजवटीत, ज्यामुळे असमानता निर्माण झाली.