बांधकाम पूर्ण झालेल्या शौचालयाच्या अनुदानासाठी निधी पडतोय कमी
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:13+5:302015-02-18T00:13:13+5:30
३ कोटी ९३ लाख रुपयांचे अनुदान प्रलंबित

बांधकाम पूर्ण झालेल्या शौचालयाच्या अनुदानासाठी निधी पडतोय कमी
३ कोटी ९३ लाख रुपयांचे अनुदान प्रलंबितभोकर : स्वच्छ भारत अभियानअंतर्गत भोकर पंचायत समितीने ग्रामस्वच्छतेची मोहीम मोठ्या प्रमाणात राबविली असून गत साडेतीन महिन्यांत ४ हजार ५२० शौचालय बांधून वापरास सुरुवात करण्यात आली आहे़ पण यापैकी ३ हजार २७८ कुटुंबांना मात्र अद्यापपर्यंत अनुदानाचा लाभ झाला नाही़ यामुळे या मोहिमेला खीळ बसते की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे़भोकर तालुक्यात १९ हजार ९६२ कुटुंब आहेत़ नोव्हेंबर २०१४ पूर्वी तालुक्यातील ६ हजार १८६ कुटुंबांनी पूर्वीच शौचालय बांधून घेतले होते़ यामुळे पंचायत समितीसमोर १३ हजार ७७६ कुुटुंबांच्या घरी शौचालय उभारण्याचे उद्दिष्ट होते़ या उद्दिष्टाच्या दिशेने पंचायत समिती पावले टाकत गत साडेतीन महिन्यांत ४ हजार ५२० कुटुंबाच्या घरी शौचालय उभारण्यात व ती वापरात आणण्यात यशस्वी झाली़ शौचालयाचे बांधकाम पूर्ण करून ते वापरात आले की शासनाकडून प्रत्येक कुटुंबाला बारा हजार रुपये अनुदान देते़ नव्याने उभारलेल्या ४ हजार ५२० कुटुंबापैकी १ हजार २४२ कुटुंबांना अनुदान देण्यात आले आहे़ यासाठी जवळपास १ कोटी ५० लाख रुपये खर्च झाले आहेत़ उर्वरित ३ हजार २७८ कुटुंबांनी शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले असले तरी यांना मात्र अद्यापपर्यंत अनुदान मिळाले नाही़शौचालयाचे बांधकाम पूर्ण करून वापरायला सुरु केलेल्या कुटुंबांना अनुदान देण्यास विलंब होत असल्याने मोठ्या प्रमाणात चालू असलेल्या या ग्रामस्वच्छता अभियानाला खीळ बसते की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे़ भोकर तालुक्यातील स्वच्छता अभियान मागील साडेतीन महिन्यांपासून चांगलीच गतिमान झाली असली तरी संपूर्ण तालुका पाणंदमुक्त होण्यासाठी आणखी ९ हजार २५६ कुटुंबाच्या घरी नव्याने शौचालय उभारण्याच्या कामाला गती घ्यावी लागणार आहे आणि यासाठी आणखी ११ कोटी १० लाख ७२ हजारांचे अनुदानाचे पंचायत समितीला नियोजन करणे गरजेचे आहे़