केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 06:14 IST2026-04-10T06:13:46+5:302026-04-10T06:14:34+5:30
आसाममध्ये ८५% हून, पुद्दुचेरीत ८६% हून अधिक तर केरळमध्ये ७८% हून अधिक मतदान

केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीमध्ये गुरुवारी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी मतदानासाठी केंद्रांवर विक्रमी गर्दी केली. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, आसाममध्ये ८५% हून, पुद्दुचेरीत ८६% हून अधिक तर केरळमध्ये ७८% हून अधिक विक्रमी मतदान झाले आहे.
एलडीएफ-यूडीएफमध्ये चुरस
केरळ: केरळमधील १४० विधानसभा मतदारसंघांसाठी गुरुवारी झालेल्या मतदानात ६२.७१ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. राज्यात सत्ताधारी एलडीएफ, काँग्रेसप्रणित यूडीएफ आणि भाजप यांच्यात त्रिकोणी संघर्ष पाहायला मिळत आहे.
बोगस मतदानाचे आरोप
राज्यात मतदान प्रक्रियेदरम्यान काही ठिकाणी वादाचे प्रसंग उद्भवले. त्रिशूरच्या मनलूरमध्ये काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ झटापट झाली. तसेच वडक्कनचेरी आणि कोळीकोडमध्ये काही मतदारांचे मतदान आधीच ‘टेंडर वोट’ म्हणून नोंदवले गेल्याचे समोर आल्याने गोंधळ उडाला. या मतदारांना मतदान करण्यापासून रोखल्याने भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.
त्रिशूरमधील वानियामपारा येथे एका वृद्धाचा मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मृत्यू झाला. विनोदन असे त्यांचे नाव असून, ते रामनचिराचे रहिवासी होते.
महत्त्वाची आकडेवारी
८१.०२% - कोळीकोड
७०.७५% - पथानामथिट्टा
७८.१२% - एकूण मतदान
आसाममध्ये पावसाच्या सावटातही मतदारांचा उत्साह
आसाम: आसाम विधानसभेच्या १२६ जागांसाठी तब्बल ७५.९१ टक्के इतके विक्रमी मतदान झाले आहे. अनेक भागांत ढगाळ वातावरण आणि पाऊस असूनही मतदारांनी केंद्रांवर मोठी गर्दी केली. भाजपप्रणित एनडीए तिसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी प्रयत्नशील आहे, तर काँग्रेस आपले गतवैभव मिळवण्यासाठी मैदानात उतरली आहे.
केंद्रावरच अधिकाऱ्याचा मृत्यू
सोनितपूर जिल्ह्यातील नादुआर विधानसभा मतदारसंघात द्वितीय मतदान अधिकारी म्हणून तैनात असलेले ४५ वर्षीय देबेन होरो गुरुवारी सकाळी आपल्या बिछान्यावर मृतावस्थेत आढळले.
पोलिसांचा हवेत गोळीबार, ७ अटकेत
आसाममध्ये तामुलपूर व शिवसागर येथे झालेल्या हिंसक चकमकींप्रकरणी पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले आहे. तामुलपूरमध्ये जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला, तर शिवसागरमध्ये राजकीय कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी तपास सुरू आहे. काही केंद्रांवर रांगेत उभे राहण्यावरून किरकोळ वाद झाले.
सरमांना हॅट्ट्रिकचा विश्वास
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी जालुकबाडी मतदारसंघात सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. मतदानापूर्वी त्यांनी कामाख्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी भाजपप्रणित एनडीएला निर्णायक जनादेश मिळेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला.
‘नव्या आसाम’चा उदय
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गौरव गोगोई यांनी जोरहाट येथे मतदान केल्यानंतर ‘नव्या आणि निडर आसाम’च्या उदयाचा नारा दिला. ही निवडणूक लोकशाही अधिकारांच्या रक्षणासाठी निर्णायक असल्याचे सांगत त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा अधोरेखित केला.
महत्त्वाची आकडेवारी
९५.५३% - दलगाव
७२.०५% - न्यू गुवाहाटी
८५.२१% - एकूण मतदान
मतदान करण्यापूर्वी आरामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी कामाख्या मंदिरासह राज्यातील अनेक धार्मिक स्थळांना भेट देऊन दर्शन घेतले आणि प्रार्थना केली.
८६ टक्क्यांहून अधिक मतदानाची पुद्दुचेरीत नोंद
पुद्दुचेरी: केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीमध्ये गुरुवारी मतदारांचा ओघ कायम राहिला. येथे ८६ टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद झाली आहे. मतदानाची वेळ संपल्यानंतरही केंद्रांवर रांगेत असलेल्या मतदारांना मतदानाची संधी देण्यात आली. सत्ताधारी एआयएनआरसी आणि विरोधी काँग्रेस यांच्यात येथे मुख्य लढत असून, स्थानिक स्वायत्तता हा प्रचाराचा प्रमुख मुद्दा ठरला आहे.
मन्नाडिपेटमध्ये भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांत राडा
मन्नाडिपेट मतदारसंघातील तिरुकनूर गावातील मतदान केंद्रावर भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार संघर्ष झाला. केंद्राबाहेर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीवरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. परिस्थिती तणावपूर्ण बनल्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमावाला पांगवले. या वादामुळे मतदानावर परिणाम झाला नाही.
प्रमुख लढती व उमेदवार
मुख्यमंत्री एन. रंगासामी हे थत्तंचवडी व मंगलम अशा दोन जागांवरून निवडणूक लढवत आहेत. थत्तंचवडीमध्ये त्यांच्यासमोर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व खासदार व्ही. वैथिलिंगम यांचे मोठे आव्हान आहे. मन्नाडिपेट मतदारसंघात गृहमंत्री ए. नमशिवायम (भाजप) आणि माजी उपाध्यक्ष टी.पी.आर. सेल्वम (काँग्रेस) यांच्यात थेट लढत होत आहे.