‘रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेवर गदा आणली नाही’
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 05:59 IST2018-12-15T05:58:22+5:302018-12-15T05:59:01+5:30
बँकेच्या स्वायत्ततेवर केंद्राने घाला घालण्याचा प्रयत्न केला नाही, असे जेटली यांनी नमूद केले.

‘रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेवर गदा आणली नाही’
मुंबई : रिझर्व्ह बँकेशी काही मुद्द्यांवर मतभेद असल्याचे मान्य करतानाच त्याबाबत किंवा बँकेच्या एकूण कार्यपद्धतीबाबत सल्लामसलत केल्याने तो रिझर्व्ह बँकेचा विनाश आहे, असे म्हणणे चुकीचे आहे, असे प्रतिपादन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी मुंबईत केले. बँकेच्या स्वायत्ततेवर केंद्राने घाला घालण्याचा प्रयत्न केला नाही, असे त्यांनी नमूद केले.
सरकारने मागितलेला अधिक निधी देण्यास बँकेने दिलेल्या नकाराबाबत बातम्या येत असतानाच, बँकेचे गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल यांनी राजीनामा दिला. त्यामुळे मोदी सरकार व अर्थमंत्री जेटली यांच्यावर चोहीकडून टीका होत आहे. यावर जेटली म्हणाले की, जवाहरलाल नेहरू तसेच इंदिरा गांधी यांच्या काळातही सरकार व रिझर्व्ह बँक यांच्यात मतभेद झाले होते आणि तेव्हाही गव्हर्नरचा राजीनामा मागण्यात आला होता.
रोकड तरलता व पतपुरवठा हा भाग बँकेच्या कार्यक्षेत्रात येतो पण त्यात काही अडथळे येत असल्यास सरकारने त्यामध्ये लक्ष घालणे चुकीचे नाही. त्यामुळेच आमच्या सरकारने बँकेशी चर्चा सुरू केली होती. त्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरना चर्चेसाठी बोलावले होते. पण त्याला बँकेच्या स्वायत्ततेवर गदा मानून काहींनी टीका केली, असे ते म्हणाले.