बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 13:45 IST2025-11-09T13:45:06+5:302025-11-09T13:45:47+5:30
बलात्काराचा आरोप असलेला AAP आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पसार. फरार झाल्यानंतर आमदाराने परदेशातून मुलाखत दिली. जाणून घ्या सनौर आमदारावरील गंभीर आरोप आणि कोर्टाची कारवाई.

बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
चंदीगड: बलात्कार आणि फसवणुकीच्या गंभीर आरोपांखाली गेल्या दोन महिन्यांपासून फरार असलेले पंजाबमधील आम आदमी पक्षाचे आमदार हरमीत सिंग पठानमाजरा यांनी पोलिसांना चकमा देत थेट ऑस्ट्रेलिया गाठल्याचे समोर आले आहे. सनौर विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेल्या पठानमाजरा यांनी परदेशातील एका पंजाबी वेब चॅनेलला मुलाखत देऊन, आपण सध्या ऑस्ट्रेलियात असल्याचे कबूल केले आहे.
पटियाला येथील सनौरचे आमदार असलेल्या पठानमाजरा यांच्यावर झीरकपूर येथील एका महिलेने बलात्कार , फसवणूक आणि गुन्हेगारी धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आमदाराने पहिल्या लग्नाची माहिती लपवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले आणि नंतर लग्नाचे आश्वासन दिले, असा या महिलेने आरोप केलेला आहे.
या प्रकरणात आमदाराला अटक करण्यासाठी पोलीस हरियाणाच्या कर्नालला गेले होते. तेव्हा पठानमाजरा यांच्या समर्थकांनी पोलिसांवर गोळीबार आणि दगडफेक करून त्यांना पळून जाण्यास मदत केली होती. या घटनेनंतर २ सप्टेंबरपासून आमदार फरार होते.
ऑस्ट्रेलियातून दिलेल्या मुलाखतीत पठानमाजरा यांनी आपल्यावरील सर्व आरोपांचे खंडन केले आहे. "हे सर्व आरोप राजकीय कटकारस्थान असून, मला जामीन मिळेपर्यंत मी भारतात परतणार नाही," असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, त्यांनी न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास व्यक्त केला. तसेच भगवंत मान सरकारवर आरोप केले. पठाणमाजरा म्हणाले की, मुख्यमंत्री भगवंत मान यांना पंजाबच्या प्रश्नांमध्ये काहीही भूमिका नाही. आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल जे काही बोलतात ते मान करतात. आमदारांना सरकारमध्ये कोणतेही स्थान नाही. सरकारने हे सर्व त्यांचा आवाज दाबण्यासाठी केले आहे.
कोर्टाची कारवाई:
पठानमाजरा वारंवार न्यायालयात हजर न राहिल्याने पटियाला न्यायालयाने त्यांच्या विरोधात प्रोक्युरेशन नोटीस जारी केली आहे. ११ नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर न झाल्यास त्यांना फरार घोषित करून मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.