पतीला झाडाला बांधून पत्नीबरोबर आळीपाळीनं सामूहिक बलात्कार, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 13:50 IST2019-06-17T13:49:37+5:302019-06-17T13:50:00+5:30
महिला सुरक्षा आणि सशक्तीकरणाचा कितीही दावा केला तरी परिस्थिती काहीशी वेगळी आहे.

पतीला झाडाला बांधून पत्नीबरोबर आळीपाळीनं सामूहिक बलात्कार, व्हिडीओ व्हायरल
लखनऊः महिला सुरक्षा आणि सशक्तीकरणाचा कितीही दावा केला तरी परिस्थिती काहीशी वेगळी आहे. उत्तर प्रदेशात महिलेवर सामूहिक बलात्काराचा आणखी एक घृणास्पद प्रकार समोर आला आहे. रामपूरमध्ये एक दाम्पत्य मोटारसायकलवरून जात होते. रस्त्यामध्ये काही तरुणांनी त्यांना अडवलं आणि महिलेबरोबर छेडछाड सुरू केली. तिच्या पतीनं त्या तरुणांना विरोध केल्यानंतर त्या गुंडांनी पतीलाच मारहाण केली. तसेच पतीसमोरच पत्नीवर आळीपाळीनं बलात्कार केला. त्या नराधम तरुणांनी मारहाणीचा एक व्हिडीओ बनवला असून, तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.
मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पीडित पती-पत्नीनं त्या आरोपी गुंडांविरोधात पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. रामपूरच्या पटवाई क्षेत्रात राहणारं दाम्पत्य बाइकवरून औषधं आणण्यासाठी 11 जून रोजी जात होते. त्याचदरम्यान चार तरुणांनी त्यांना घेरलं आणि त्यांची बाइक थांबवून छेडछाड सुरू केली. त्या पती-पत्नीनं त्याला विरोध केल्यानंतर त्या नराधम तरुणांनी पतीला मारहाण केली, तर पत्नीवर सामूहिक बलात्कार केला. त्या तरुणांनी मारहाणीचा एक व्हिडीओसुद्धा बनवला आहे.
आरोपींनी पतीला झाडाला बांधून पत्नीबरोबर आळीपाळीनं सामूहिक बलात्कार केला आहे. या प्रकरणात तीन आरोपींची ओळख पटली असून, कलम 376डी, 323, 504, 66E अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींना पकडण्यासाठी चार टीम बनवण्यात आल्या असून, लवकरच सर्व आरोपींना जेलमध्ये पाठवलं जाणार आहे.