तिकीट काढा... राम मंदिर १ जानेवारीपर्यंत पूर्ण होणार, गृहमंत्री अमित शहा म्हणाले, तारीख सांगत नाही म्हणता? घ्या तारीख!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 12:03 IST2023-01-06T12:02:43+5:302023-01-06T12:03:06+5:30
अयोध्येतील बहुप्रतीक्षित राम मंदिर पूर्णत्वाची तारीख केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी जाहीर केली.

तिकीट काढा... राम मंदिर १ जानेवारीपर्यंत पूर्ण होणार, गृहमंत्री अमित शहा म्हणाले, तारीख सांगत नाही म्हणता? घ्या तारीख!
सबरूम (त्रिपुरा) : अयोध्येतील बहुप्रतीक्षित राम मंदिर पूर्णत्वाची तारीख केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी जाहीर केली. पुढच्या वर्षी १ जानेवारीपर्यंत रामलल्लाचे भव्य मंदिर बांधून पूर्ण होईल, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी देशभरात पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात झालेल्या विविध धार्मिक स्थळांच्या कॉरिडॉरची माहितीही दिली.
जाहीर सभेत शहा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. ‘२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आपण भाजपचे अध्यक्ष होतो, तर राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होते. ते रोज विचारायचे, मंदिर तिथेच बांधणार; पण तारीख सांगत नाहीत... तर नोंद घ्या, १ जानेवारी २०२४ ला तुम्हाला अयोध्येत
गगनचुंबी राम मंदिर तयार झालेले दिसेल,’ असे ते म्हणाले.
केवळ राम मंदिरच नाही...
‘केवळ राम मंदिरच नाही, तर एक-दोन वर्षे जाऊ द्या, माँ त्रिपुरा सुंदरीचे मंदिरही इतके भव्य बांधले जाईल की संपूर्ण जग ते बघायला येईल. काशी विश्वनाथ, महाकालचा कॉरिडॉर बनविला. सोमनाथ आणि अंबाजीचे मंदिर सोन्याचे बनविले जात आहे. माँ विंध्यवासीनीचे मंदिर नवीन बांधले जात आहे,’ असेही ते म्हणाले.
शहा यांनी दक्षिण त्रिपुरा जिल्ह्यातील सबरूम येथे, तसेच उत्तर त्रिपुरा जिल्ह्यातील धर्मनगर येथे रथयात्रेला हिरवा झेंडा दाखविला होता. या वर्षाच्या सुरुवातीला राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्य सरकारची कामगिरी जनतेला सांगणे हा या यात्रेचा उद्देश आहे.
काँग्रेस आणि माकपने राम मंदिराचा मुद्दा बराच काळ न्यायालयाच्या अखत्यारीत ठेवला होता. तर या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिराची पायाभरणी केली होती. आता त्रिपुरावासीयांनी अयोध्येचे तिकीट काढून ठेवावे.
- अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री