राम सुतार : शून्यातून विश्व निर्माण करणारे जागतिक कीर्तीचे शिल्पकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 10:38 IST2025-12-19T10:37:28+5:302025-12-19T10:38:06+5:30
वयाचे शतक पार करूनही ते कार्यरत होते. दिल्ली येथे त्यांनी 'राम सुतार कला संचालनालय' स्थापन केले. त्यातून शेकडो शिल्पकार त्यांनी घडविले.

राम सुतार : शून्यातून विश्व निर्माण करणारे जागतिक कीर्तीचे शिल्पकार
नवी दिल्ली : राम सुतार यांचे पूर्ण नाव राम वंजी सुतार होते. त्यांचा जन्म धुळे जिल्ह्यातील गोंदूर या गावी झाला. त्यांचे कुटुंब अतिशय गरीब होते. अशा कष्टप्रद व संघर्षमय परिस्थितीत त्यांच्या हातातील प्रतिभा विकसित होत गेली. लहानपणापासून ते शिल्पकलेकडे आकर्षिले गेले होते. पुढे ते मुंबईत सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट येथे शिक्षणासाठी आले. १९५३ मध्ये त्यांनी प्रतिरूपण (मॉडेलिंग) व शिल्पकलाविषयक पदविका मिळविली. त्यावेळी त्यांना प्रतिरूपणामधील प्रतिष्ठेचे 'मेयो' सुवर्णपदक मिळाले होते.
पदविका मिळविल्यानंतर ते औरंगाबाद येथे पुरातत्व विभागात रुजू झाले तेव्हा त्यांनी अजिंठा व वेरुळ येथील अनेक शिल्पांचे जीर्णोद्धाराचे काम पाहिले. पण सरकारी नोकरीत त्यांचा जीव रमला नाही. त्यांनी पूर्णवेळ शिल्पकार होण्याचा निर्णय घेतला.
वयाचे शतक पार करूनही ते कार्यरत होते. दिल्ली येथे त्यांनी 'राम सुतार कला संचालनालय' स्थापन केले. त्यातून शेकडो शिल्पकार त्यांनी घडविले.
ब्राँझ धातू शिल्पकलेत हातखंडा, विख्यात शिल्पनिर्मिती
१. राम सुतार यांचे बहुतेक प्रसिद्ध कामे ही ब्राँझ धातूंमध्ये आहेत. अनेक स्मारक शिल्पेही त्यांनी घडवली. त्यांचे गाजलेले पहिले शिल्प होते ते गांधीसागर धरणावरील चंबल हे होय. हे ४५ फुटी शिल्प एकाच साच्यात कोरलेले आहे. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंना हे काम इतके आवडले, की त्यांनी भाक्रा नांगल धरणावर ब्राँझमधील स्मारकशिल्प 'ट्रायम्फ ऑफ लेबर' बनविण्यास त्यांना सांगितले. मात्र, पुरेशा निधीच्या अभावी ते अपूर्ण राहिले.
२. अनेक भारतीय नेत्यांचा 'शिल्प'कारः सुतार यांना भारत सरकारने भारतीय नेत्यांची शिल्पे बनविण्यासाठी अधिकृत शिल्पकार म्हणून नेमले होते. त्यांनी पं. नेहरु, पं. दीनदयाळ उपाध्याय, रफी अहमद किडवाई अशा अनेक भारतीय नेत्यांची शिल्पे बनवली. त्यांची ब्राँझमधील शिल्पे संसद भवन आणि महत्त्वपूर्ण शासकीय इमारतींत, तसेच विविध शहरांत स्थापित केलेली आहेत.
मातीचा स्पर्श ते आभाळाची उंची
चंद्रकांत सोनार
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : मातीचा स्पर्श ते आभाळाची उंची अशी यशोगाथा असणाऱ्या ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचा जन्म धुळे जिल्ह्यातील गोंदूर येथे १९ फेब्रुवारी १९२५ साली राम सुतार यांचा जन्म झाला.
त्यांचे चौथीपर्यंतचे शिक्षण गोंदूर येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर निमडाळे गावात दहावीपर्यंत शिक्षण झाले, लोहार काम पारंपरिक व्यवसाय असल्याने वडिलांना ते मदत करीत होते. धुळ्यातील जो. रा. सिटी विद्यालयात शिक्षण झाल्यानंतर मुंबईत जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकायला आले.
पुरस्कार दहा महिन्यांपूर्वी राम सुतार यांना महाराष्ट्र शासनाच्या मिळाल्यानंतर त्यांचा गोंदूर या मूळगावी नागरी सत्कार करण्यात आला होता. सुतार यांची ही भेट शेवटची होती. सुतार यांची चाळीसगाव येथील कलामहर्षी केकी मूस यांच्याशी घट्ट मैत्री होती.
मालवणात मिळाला आठवणींना उजाळा
महेश सरनाईक
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंधुदुर्ग: राम सुतार यांच्या निधनानंतर मालवणस्थित ऐतिहासिक राजकोट किल्ल्यावर देशातील सर्वात उंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य दिव्या पुतळ्याच्या आठवर्णीनाही नव्याने उजाळा मिळाला. २०२४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर नव्या पुतळ्याची जबाबदारी राम सुतार यांना महाराष्ट्र शासनाने दिली होती आणि हा पुतळा मे २०२५ पर्यंत पूर्ण झाला होता.
या पुरस्कारांनी सन्मानित राम सुतार यांच्या शिल्पकलेत कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने त्यांना १९९९ साली पद्मश्री, २०१६ साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.
त्यांना नुकताच महाराष्ट्र सरकारने राज्याचा सर्वोच्च 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने सन्मानित केले होते.