७०० कोटींच्या दानासह अयोध्येतील राम मंदिर तिसऱ्या स्थानी; पहिला अन् दुसऱ्या क्रमांकावर कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 16:01 IST2025-02-19T15:58:58+5:302025-02-19T16:01:31+5:30

Ayodhya Ram Mandir: केवळ एका वर्षभरात अयोध्येचे राम मंदिर देशातील सर्वांत श्रीमंत मंदिराच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचल्याचे सांगितले जात आहे.

ram mandir in ayodhya ranks third with donation of rs 700 crore know which temple ranks on first and second | ७०० कोटींच्या दानासह अयोध्येतील राम मंदिर तिसऱ्या स्थानी; पहिला अन् दुसऱ्या क्रमांकावर कोण?

७०० कोटींच्या दानासह अयोध्येतील राम मंदिर तिसऱ्या स्थानी; पहिला अन् दुसऱ्या क्रमांकावर कोण?

Ayodhya Ram Mandir: २२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील भव्य राम मंदिराचे लोकार्पण करून रामललाचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा अद्भूतपूर्व केला. यानंतर अयोध्येत भाविकांचा जो महासागर उसळला आहे, त्याला किंचितही ओहोटी लागलेली नाही. १४४ वर्षांनी येणाऱ्या महाकुंभमेळ्याचे अयोजन करण्यात आले आहे. मकर संक्रांती ते महाशिवरात्री या काळात महाकुंभमेळा होत आहे. महाकुंभमेळ्यानंतर भाविक अयोध्येत दाखल होत असल्यामुळे राम मंदिर व्यवस्थापनावरील ताण वाढत चालला आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज सुमारे ३ लाखांहून अधिक भाविक अयोध्येत येत असून, राम मंदिरात रामललाचे दर्शन घेत आहेत. यातच आता अयोध्येतील श्रीराम मंदिर देशातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वांत श्रीमंत मंदिर बनले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी २२ जानेवारी रोजी रामलला भव्य राम मंदिरात विराजमान झाले. या एका वर्षांत अयोध्येने अनेक विक्रम प्रस्थापित केले. रामनगरी अयोध्येत विक्रमी संख्येने भाविक पोहोचत आहेत. दानधर्मात राम मंदिराने वैष्णोदेवी आणि शिर्डी साई मंदिरांना मागे टाकले आहे. राम मंदिर हे भाविकांची पहिली पसंती बनत आहे. फक्त एका वर्षांत राम मंदिर तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहे.

वर्षभरात १३ कोटी भाविक, पर्यटक अयोध्येत आले

राम मंदिरात रामललाचे दर्शन घेण्यासाठी दररोज लाखो भाविक, पर्यटक अयोध्येत पोहोचत आहेत. गेल्या वर्षभरात १३ कोटींहून अधिक लोक अयोध्येत पोहोचले आहेत. दानधर्मात आंध्र प्रदेशातील तिरुपती वेंकटेश्वर मंदिर भारतातील सर्वांत श्रीमंत मंदिरांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. दरवर्षी या मंदिरात १५०० ते १६५० कोटी रुपयांच्या दान, देणग्या दिल्या जातात. दुसऱ्या क्रमांकावर केरळचे पद्मनाभस्वामी मंदिर आहे. या मंदिरात वार्षिक ७५० ते ८०० कोटींचे दान भाविकांकडून दिले जाते. यानंत आता राम मंदिर तिसऱ्या स्थानावर पोहोचले असून, एका वर्षात ७०० कोटी रुपयांचे दान मिळाल्याचे सांगितले जात आहे. 

कोणत्या मंदिराला किती दान मिळतेय?

चौथ्या क्रमांकावर पंजाब अमृतसर येथे असलेले सुवर्ण मंदिर आहे. येथे वार्षिक ६५० कोटी रुपयांची दान दिले जाते. पाचव्या क्रमांकावर जम्मू आणि काश्मीरचे वैष्णोदेवी मंदिर आहे. दरवर्षी येथे ६०० कोटी रुपयांचे दान या मंदिरात दिले जाते. सहाव्या क्रमांकावर महाराष्ट्राचे शिर्डी साई बाबा मंदिर आहे. दरवर्षी या मंदिरात ५०० कोटी रुपयांचे दान दिले जाते. सातव्या क्रमांकावर ओडिशामध्ये असलेले पुरी येथील जगन्नाथ मंदिर असून, येथे ४०० कोटी रुपयांचे दान दिले जाते. आठव्या क्रमांकावर नवी दिल्लीतील अक्षरधाम मंदिर आहे. येथे दरवर्षी २०० ते २५० कोटी रुपयांचा निधी येतो. नवव्या क्रमांकावर गुजरातमधील सोमनाथ मंदिर आहे. येथे १५० ते २०० कोटी रुपयांच्या दान, देणग्या दिल्या जातात.

१ महिना, १ कोटी भाविकांचे रामदर्शन, अयोध्या राम मंदिरात १५ कोटींचे महादान

साधारण १४ जानेवारीपासून अयोध्येत येणाऱ्या भाविकांच्या संख्येत प्रंचड वाढ सुरू झाली आहे. एका महिन्यात एक कोटींहून अधिक भाविकांनी श्रीरामललाचे दर्शन घेतले आहे. महाशिवरात्रीपर्यंत भाविक मोठ्या प्रमाणात अयोध्येत येण्याचा सिलसिला सुरू राहण्याची अपेक्षा आहे. राम मंदिर ट्रस्ट कार्यालयाचे प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी म्हटले आहे की, ट्रस्टच्या १० देणगी काऊंटरवर दररोज १० लाख रुपयांपेक्षा जास्त देणगी दिली जात आहे. महाकुंभाच्या १ महिन्यात १५ कोटी रुपयांहून अधिक दान जमा झाले आहे. यामध्ये रामललासमोर ठेवलेल्या ६ दानपेटीत जमा झालेल्या रकमेचाही समावेश आहे. भाविकांची गर्दी इतकी मोठी आहे की, ज्यांना दानपेटीत पैसे टाकता येत नाहीत, त्यांनी ते बाहेरच ठेवावे लागत आहे. कारण गर्दीच्या दबावामुळे लोकांना थांबायला वेळ मिळत नाही. महाकुंभाच्या आधीही मंदिरात दरमहा सुमारे ३ कोटी रुपये देणग्या स्वरूपात जमा होत होते.

 

Web Title: ram mandir in ayodhya ranks third with donation of rs 700 crore know which temple ranks on first and second

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.