राम मंदिराच्या वेळेत बदल, आता भक्तांना दर्शन घेण्यासाठी मिळणार अधिक वेळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 16:13 IST2025-02-05T16:12:26+5:302025-02-05T16:13:10+5:30
Ram Mandir : पूर्वी सकाळी ७ वाजल्यापासून दर्शन मिळत असे, परंतु आता भक्तांना जास्त वेळ दर्शन घेता येणार आहे.

राम मंदिराच्या वेळेत बदल, आता भक्तांना दर्शन घेण्यासाठी मिळणार अधिक वेळ!
Ram Mandir : अयोध्येतील रामलल्लांच्या भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मंदिरात दर्शनसाठी येणाऱ्या भक्तांची वाढती संख्या लक्षात घेता राम मंदिर ट्रस्टकडून दर्शन आणि आरतीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. आता भक्तांना भगवान श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे. पूर्वी सकाळी ७ वाजल्यापासून दर्शन मिळत असे, परंतु आता भक्तांना जास्त वेळ दर्शन घेता येणार आहे.
मंदिर ट्रस्टने सांगितले की, आता मंगला आरती पहाटे ४:०० वाजता होईल, जी दिवसाची पहिली आरती असेल आणि त्यानंतर मंदिराचे दरवाजे काही काळासाठी बंद केले जातील. यानंतर सकाळी ६:०० वाजता शृंगार आरती होईल, त्यानंतर राम मंदिर सामान्य भाविकांसाठी उघडले जाईल.
याचबरोबर, मंदिरात दुपारी १२:०० वाजता राज भोगाची वेळ असणार आहे. यावेळी रामलल्लांना नैवेद्य अर्पण केला जाईल, परंतु या काळातही भक्तांना रामलल्लांचे दर्शन घेता येईल. संध्याकाळी ७:०० वाजता आरती होईल, यावेळी मंदिराचे दरवाजे १५ मिनिटांसाठी बंद राहतील, परंतु दर्शनाची व्यवस्था कायम राहील. यानंतर रात्री १०:०० वाजता शयन आरती होईल, त्यानंतर मंदिराचे दरवाजे बंद केले जातील.
या नवीन बदलामुळे भक्तांना जास्त वेग रामलल्लांचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. दरम्यान, जुन्या पद्धतीनुसार, सकाळचे दर्शन सकाळी ७ वाजता सुरू होत होते आणि पूर्वी शयन आरती रात्री ९:३० वाजता होत होती. या नवीन बदलामुळे सकाळी १ तास ३० मिनिटे आणि संध्याकाळी ३० मिनिटे अतिरिक्त वेळ मिळणार आहे. ज्यामुळे भाविकांना दर्शन घेण्यासाठी खूप दिलासा मिळू शकतो.
राम मंदिर ट्रस्टचे म्हणणे आहे की, भाविकांना जास्त काळ भगवान दर्शन घेण्याची संधी मिळावी यासाठी हा बदल करण्यात आला आहे. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. जेणेकरून दूरवरून येणाऱ्या भाविकांना कोणत्याही अडचणीशिवाय दर्शन घेता येईल.