उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावांची राखी बांधण्यासाठी वाट पाहत होत्या. पण अचानक असं काही घडलं की किवाड गावातील एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. हरियाणाहून आपल्या गावी परतत असेलल्या ३५ वर्षीय नीतूचा मुसळधार पावसात रस्त्यावर स्कूटी घसरल्याने मृत्यू झाला.
किवाड गावातील रहिवासी नीतू हरियाणामध्ये काम करत होता. रक्षाबंधनाच्या दिवशी तो आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी गावात पोहोचत होता. जयरामपूर आणि किवाड गावातील रस्ता गेल्या तीन दिवसांपासून पावसाच्या पाण्यात बुडाला होता. गावकऱ्यांनी त्याला पुढे जाण्यास मनाई केली, परंतु घरी पोहोचण्याच्या घाईत त्याने इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं.
नीतू स्कूटी घेऊन त्याच रस्त्यावरून जाताच तो पाण्यात पडला आणि वाहून गेला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी लगेच शोध सुरू केला, परंतु सुमारे दोन तासांनंतर त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा भरला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्याची मोठी बहीण रक्षाबंधन साजरं करण्यासाठी तिच्या माहेरी आली होती, तर एक धाकटी बहीणही गावात होती.
दोन्ही बहिणींच्या राखी बांधण्यासाठी आपल्या भावाची वाट पाहत होत्या. सततच्या पावसामुळे गावात आणि परिसरात पाणी साचलं. गंभीर परिस्थिती निर्माण झाली. अनेक रस्ते बंद असल्याने लोकांना ये-जा करणं कठीण झालं. वेळेवर पाण्याचा निचरा न झाल्यामुळे असे अपघात होत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. नीतूचा मृत्यू प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच झाल्याचं त्यांनी म्हटलं.