Rajya Sabha Election: 'त्या' ५ मतांचा घोळ संपेना; केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय अद्यापही कळेना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2022 00:22 IST2022-06-11T00:21:56+5:302022-06-11T00:22:23+5:30
७ तासानंतरही अद्याप निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली नाही. त्यामुळे विधान भवनात उमेदवार, आमदारांपासून सगळेच नेते हजर आहेत.

Rajya Sabha Election: 'त्या' ५ मतांचा घोळ संपेना; केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय अद्यापही कळेना
नवी दिल्ली - राज्यसभेच्या सहा जागांसाठी शुक्रवारी मतदान पार पडले. या निवडणुकीत २८५ आमदारांनी मतदान केले. परंतु भाजपाने महाविकास आघाडीच्या जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांच्या मतांवर आक्षेप घेतला. त्यानंतर महाविकास आघाडीनेही सुधीर मुनगंटीवार आणि अपक्ष आमदार रवी राणा यांच्यावर आरोप केले. या दोन्ही तक्रारी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पोहचल्या.
संध्याकाळी ५ वाजता राज्यसभेच्या निवडणुकीची मतमोजणी होणार होती. परंतु अद्याप ७ तास झाले तरीही मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील निवडणूक आयोगाला व्हिडीओ फुटेज मागवले. त्यानंतर सुमारे दीड तास केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्यातील निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर कुठेतरी निवडणूक आयोग निर्णय देईल असं बोललं जात होतं. परंतु अजूनही निर्णय आला नाही.
७ तासानंतरही अद्याप निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली नाही. त्यामुळे विधान भवनात उमेदवार, आमदारांपासून सगळेच नेते हजर आहेत. निवडणूक आयुक्तांच्या बैठकीनंतर निर्णयाची कॉपी रिटर्निंग ऑफिसरला कळवण्यात येईल. त्यानंतर मतमोजणीला सुरुवात होण्याची चिन्हे आहेत. हरियाणा, महाराष्ट्राबाबत राज्यसभेचा तिढा अद्याप सुटलेला नाही.
त्या ५ मतांचे काय होणार?
निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर, सुहास कांदे, सुधीर मुनगंटीवार आणि रवी राणा यांच्या मतांचे काय होणार यावर पुढचा कल कळू शकणार आहे.
...तर माझे पॉलिटिकल करिअर बर्बाद होऊ शकते
याबाबत जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मत दिल्यानंतर ते पक्षाच्या एजंटला दाखवणे आवश्यक असते, तसे केले नाही तर पक्षाचे सदस्यत्व रद्द होऊ शकते, पक्ष कारवाई करू शकतो. दुर्दैवाने संपूर्ण महाराष्ट्रला वेठीस धरून, मोठा संभ्रम निर्माण करून, गैरसमज पसरत असतील तर, त्याचा स्पष्ट खुलासा करण्यासाठी मी येथे आलो आहे. "मी साधारणपणे बारा साडेबाराच्या सुमारास विधानसभेत पोहोचलो. उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात गेलो. तेथून मला जे सांगण्यात आले. ते ऐकूण मी मतदानासाठी गेलो. मतदान केल्यानंतर मी ते माझ्या पक्षांच्या एजंटना दाखवले. तेव्हा कागद माझ्या छातीवर होता, कॅमेरा माझ्या मागे होता. त्यावेळी मी थोडा हसलो. त्याला वेगळे कारण होते. यानंतर मतपत्रिका बंद करून मी बाहेर आलो, मतदान पेटीकडे गोलो, मतदान टाकले आणि बाहेर निघून गेलो असं मंत्री जितेंद्र आव्हाडांनी सांगितले.
तर महाराष्ट्राला वेठीस धरण्याची एकही संधी दिल्ली सोडत नाही. महाराष्ट्राच्या शत्रूंना कोपरापासून नमस्कार! आज नमस्कार. उद्या हात सोडावा लागेल हे लक्षात ठेवा! भारतीय जनता पक्षाने देशातील लोकशाही, न्यायव्यवस्था, केंद्रीय तपास यंत्रणा, आणि निवडणुक आयोगास देखील पकडीत घेतले आहे. महाराष्ट्रात तीन मतांबाबत निर्णय घ्यायला 7 तास लागतात? कमाल आहे. लोकशाहीची हास्य जत्रा किती काळ चालू ठेवणार? जिंकणार तर महाविकास आघाडीच असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.