ज्या राज्यातून निवडून आला नव्हता एकही आमदार, तिथे भाजपानं दिला राज्यसभेचा उमेदवार, नेमकी रणनीती काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 15:58 IST2024-01-08T15:56:57+5:302024-01-08T15:58:07+5:30
Rajya Sabha Election : २०१९ मध्ये झालेल्या सिक्कीम विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाचं खातंही उघडलं नव्हतं. येथे भाजपाचा एकही आमदार नव्हता. मात्र तरीही आता भाजपानं येथून राज्यसभेसाठी उमेदवार उतरवल्याने यामागे भाजपाची रणनीती काय? याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झालेली आहे.

ज्या राज्यातून निवडून आला नव्हता एकही आमदार, तिथे भाजपानं दिला राज्यसभेचा उमेदवार, नेमकी रणनीती काय?
पुढच्या काही महिन्यांमध्ये देशात लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. तत्पूर्वी राज्यसभेच्या काही जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. या निवडणुकीतील घडामोडींदरम्यान, पूर्वोत्तर राज्यातील सिक्कीमचं नाव चर्चेत आलेलं आहे. त्याचं कारण ठरतंय ते म्हणजे भाजपानं येथून राज्यसभा निवडणुकीसाठी दिलेला उमेदवार. भाजपाने येथून दोरजी त्शेरिंग लेप्चा यांना उमेदवारी दिली आहे. २०१९ मध्ये झालेल्या सिक्कीम विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाचं खातंही उघडलं नव्हतं. येथे भाजपाचा एकही आमदार नव्हता. मात्र तरीही आता भाजपानं येथून राज्यसभेसाठी उमेदवार उतरवल्याने यामागे भाजपाची रणनीती काय? याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झालेली आहे.
याचं कारण म्हणजे २०१९ नंतर सिक्कीमच्या राजकारणात अनेक उलथापालखी घडल्या आहेत. तसेच मुख्यमंत्री पी.एस. गोले यांच्या पक्षाने स्वत:चा उमेदवार न देता भाजपाला उमेदवारी देण्यामागेही काही खास कारणं आहेत. पी.एस. गोले हे भ्रष्टाचाराची शिक्षा भोगल्यानंतर २०१८ मध्ये तुरुंगातून बाहेर आले होते. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात शिक्षा झाल्यावर सहा वर्षे निवडणूक लढवण्यास व्यक्ती अपात्र ठरते. त्यामुळे गोले यांनी विधानसभा निवडणूक लढवली नव्हती. मात्र २०१९ मध्ये विजय मिळवल्यानंतर एसकेएमच्या आमदारांनी पी.ए. गोले यांचीच आपला नेता म्हणून निवड केली होती. त्यानंतर गोले हे मुख्यमंत्री झाले होते. तसेच नंतर पोटनिवडणुकीत विजय मिळवून आमदार बनले होते. त्यावेळी येथील विरोधी पक्ष असलेल्या एसकेएफने निवडणूक आयोगाने गोले यांच्या अपात्रतेचा कालावधी ६ वर्षांवरून कमी करून एक वर्षांवर आणल्याचा आरोप केला होता, तसेच याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. दरम्यान, भाजपाच्या सहकार्यामुळेच गोले यांची खुर्ची वाचली होती, त्याची परतफेड गोले हे राज्यसभा उमेदवारी भाजपाला सोडून करत आहेत, असा दावाही करण्यात येत आहे.
३२ जागा असलेल्या सिक्कीमच्या विधानसभेमध्ये २०१९ च्या निवडणुकीत गोले यांच्या एसकेएम पक्षाला १७ तर पवन चामलिंग यांच्या पक्षाला १५ जागा मिळाल्या होत्या. राजकारणात माहिर असलेले चामलिंग एसकेममधील आमदार फोडू शकले असते. मात्र भाजपाने चामलिंग यांच्या पक्षातील १० आमदारांना फोडून आपल्या पक्षात घेतले. त्यामिुळे गोले यांचं सरकार स्थिर राहिलं होतं.