"आम्ही देवाचं दर्शन घेण्यासाठी अयोध्या-काशीला जातो अन् भाजपचे लोक...", राज्यसभेत संजय सिंह यांचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 18:35 IST2024-12-17T18:33:42+5:302024-12-17T18:35:45+5:30
"हे लोक, संपूर्ण देशातील मशिदींमध्ये मंदीर शोधत आहेत. हे लोक गेल्या दशकापासून 'भारत खोदो' योजना चालवत आहेत."

"आम्ही देवाचं दर्शन घेण्यासाठी अयोध्या-काशीला जातो अन् भाजपचे लोक...", राज्यसभेत संजय सिंह यांचा निशाणा
राज्य सभेत संविधानावरील चर्चेदरम्यान आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी भाजप सरकारवर थेट निशाणा साधला आहे. त्यांनी मतदार यादीतून नाव कापल्या गेल्याच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला. तसेच, त्यांच्या कारागृहात जाण्यासंदर्भात झालेल्या टिप्पणीवरही त्यांनी भाष्य केले. जेव्हा सत्ता बदलेल, तेव्हा कुणीही बाहेर राहणार नाही. केवळ तीन तासांसाठी ईडी-सीबीआय द्या. सर्वांना कारागृहात पाठवेन, असे संजय सिंह यांनी म्हटले आहे.
संजय सिंह यांनी दिल्ली निवडणुकीपूर्वी मतदार यादीतून नाव कपल्या गेल्याच्या मुद्दावरही प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, "तुघलकाबाद येथील बूथवर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने मतदारांची नावे कापवली आहेत." यावर सभागृह नेते जेपी नड्डा म्हणाले, "ज्यांची नावे काढली जात आहेत, ते बांगलादेशी-रोहिंग्या तर नाहीत ना, ही बघण्यासारखी गोष्ट आहे." यानंतर संजय सिंह यांनी, "राम सिंह यांच्यासह अनेक मतदारांची नावे वाचून दाखवली आणि पूर्वांचली बांधवांना रोहिंग्या-बांगलादेशी म्हणण्याची त्यांची हिम्मत कशी झाली?" असा सवालही केला.
"आमचे पूर्वांचली बांधव कष्ट करतात, घाम गाळतात. ते यांचे डिपॉझिट जप्त करतील. त्यांना घोटाळ्यातून निवडणूक जिंकायची आहे. मात्र ही चाल दिल्लीत चालणार नाही. त्यांना निवडणूक निपटवायची आहे. निवडणुकीतच गडबड केली तर संविधान कसे वाचणार?" असा प्रश्नही संजय सिंह यांनी केला.
मशिदींमधील सर्वेक्षणावरूनही साधला निशाणा -
देशातील मशिदींमधील सर्वेक्षणासंदर्भात बोलताना आम आदमी पार्टी नेते संजय सिंह म्हणाले, "आम्ही लोक देवाच्या दर्शनासाठी अयोध्या-काशी येथे जातो. मात्र, भाजपच्या लोकांना जेव्हा दर्शन करायचे असते, तेव्हा ते, मशिदीत जातात. हे लोक, संपूर्ण देशातील मशिदींमध्ये मंदीर शोधत आहेत. हे लोक गेल्या दशकापासून 'भारत खोदो' योजना चालवत आहेत."