'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 13:44 IST2025-05-15T13:42:27+5:302025-05-15T13:44:36+5:30
Rajnath Singh Jammu Kashmir: 'यापुढे भारतीय भूमीवर कोणताही दहशतवादी हल्ला युद्धाचे निमंत्रण मानले जाईल.'

'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
Rajnath Singh Jammu Kashmir:ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी(15) जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचून जवानांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पाकिस्तानचा अणुबॉम्ब आयएईएच्या(IAEA) देखरेखीखाली आणण्याची मागणी केली. याशिवा त्यांनी पाकिस्तानला इशारा दिला की, दोन्ही देशांनी युद्धविरामावार सहमती दर्शविली आहे. पण, पाकिस्तानकडून कोणत्याही प्रकारचे नापाक कृत्य झाले, तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ.
बेजबाबदार देशाच्या हातात अणुबॉम्ब सुरक्षित नाही
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी श्रीनगरमधील बदामी बाग छावणीला भेट दिली. यावेळी पाकिस्तानच्या अणुबॉम्बच्या धमकीवरही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, मी जगासमोर हा प्रश्न उपस्थित करू इच्छितो की, IAEA (आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था) ने पाकिस्तानची अण्वस्त्रे आपल्या नियंत्रणात घ्यावीत. आम्हाला त्यांच्या अणुबॉम्ब धमकीची पर्वा नाही. अशा बेजबाबदार देशाच्या हातात अणुबॉम्ब सुरक्षित आहेत का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
Addressing the brave soldiers of the Indian Army at Badami Bagh Cantt, Srinagar. https://t.co/tpEqiG6btE
— Rajnath Singh (@rajnathsingh) May 15, 2025
भारताची सामाजिक एकता तोडण्याचा प्रयत्न...
पहलगाममधील दहशतवादी घटना घडवून भारताला दुखावण्याचा आणि भारताची सामाजिक एकता तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांनी भारताच्या डोक्यावर हल्ला केला, आम्ही त्यांच्या छातीवर जखमा केल्या. ऑपरेशन सिंदूर ही भारताने त्याच्या इतिहासातील दहशतवादाविरुद्ध सुरू केलेली सर्वात मोठी कारवाई आहे. गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षांपासून भारत सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाचा सामना करत आहे. आज भारताने संपूर्ण जगाला हे स्पष्ट केले आहे की, आम्ही दहशतवादाविरुद्ध कोणत्याही थराला जाऊ शकतो.
...तर युद्धाचे निमंत्रण मानले जाईल
तुम्हाला आठवत असेल की, सुमारे एकवीस वर्षांपूर्वी याच पाकिस्तानने इस्लामाबादमध्ये अटलजींसमोर घोषणा केली होती की, त्यांच्या भूमीतून आता दहशतवाद निर्यात केला जाणार नाही. पण पाकिस्तानने भारताशी विश्वासघात केला आणि आजही केला जात आहे. आता त्याला याची मोठी किंमत मोजावी लागत आहे. जर दहशतवाद सुरूच राहिला तर ही किंमत वाढतच जाईल. भारतीय भूमीवर कोणताही दहशतवादी हल्ला युद्धाचे निमंत्रण मानले जाईल. आपल्या पंतप्रधानांनी हे देखील स्पष्ट केले आहे की दहशतवाद आणि संवाद एकत्र चालू शकत नाहीत आणि जर संवाद असेल तर तो दहशतवाद आणि पीओकेवर असेल, असेही राजनाथ सिंह यावेळी म्हणाले.