कोरोना काळातच राजस्थानात नवं संकट! अचानक मरू लागले कावळे; प्रशासनानं उचललं असं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2020 15:56 IST2020-12-31T15:54:31+5:302020-12-31T15:56:08+5:30
कोरोना व्हायरसच्या दहशतीतच राजस्थानातील झालावाडमध्ये अचानकपणे मोठ्या प्रमाणावर कावळ्यांचा मृत्यू झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोरोना काळातच राजस्थानात नवं संकट! अचानक मरू लागले कावळे; प्रशासनानं उचललं असं पाऊल
जयपूर - कोरोना व्हायरसच्या दहशतीतच राजस्थानातील झालावाडमध्ये अचानकपणे मोठ्या प्रमाणावर कावळ्यांचा मृत्यू झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा प्रकार गुरुवारी समोर आल्यानंतर स्थानिक प्रशासनाने या भागात कलम 144 लागू केले आहे. पक्ष्यांशी संबंधित एखाद्या फ्लूमुळेच या भागात अचानकपणे कावळे मरू लागले, असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
पोल्ट्री फॉर्मस-दुकानांतून सॅम्पल घेण्याचे आदेश -
झालावाड येथील जिल्हाधिकारी जिकिया गोहेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'संबंधित भागात कलम 144 लगू करण्यात आले आहे. रॅपिड रिस्पॉन्स टीमशी संपर्क साधण्यात आला असून पोल्ट्री फॉर्मस-दुकानांतून सॅम्पल घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.' तसेच फ्लूमुळे पोल्ट्री फार्मदेखील संक्रमित झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामुळे सर्व कोंबड्या नष्ट कराव्या लागतील. यासाठी मालकांना योग्य तो मोबदलाही दिला जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या पूर्वीच्या आदेशात पुष्टी केली होती, की पक्षांच्या फ्लूमुळे कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच प्रकरणाची चौकशी फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि अॅनिमल हस्बंडरी डिपार्टमेंटची संयुक्त टीम करेल, असेही त्यांनी सांगितले होते.
बर्ड फ्लूमुळे कावळ्यांचा मृत्यू -
'मिळालेले सॅम्पल्स भोपाळच्या नॅशनल इंस्टिट्यूट अॅनिमल डिसीज येथे पाठवण्यात आले आहेत. एका अहवालानुसार, बर्ड फ्लूमुळे कावळ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे,' असेही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
कसा पसरतो बर्ड फ्लू -
सर्वसाधारणपणे, बर्ड फ्लू इंफ्लुएन्झा 'ए' व्हायरसमुळे पसरतो. हा फ्लू संक्रमित पक्ष्यांपासून पसरतो. एव्हियन इंफ्लुएन्झा आजारी पक्षांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांतही सहजपणे पसरतो. यानंतर त्या लोकांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांनही तो सहजपणे पसरू लागतो.