सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 06:57 IST2025-06-12T06:56:55+5:302025-06-12T06:57:21+5:30
Raja Raghuvanshi Murder Case: मेघालयात हनिमूनदरम्यान पतीची हत्या केल्याप्रकरणी अटक केलेल्या त्याची पत्नी सोनम हिनेच हा गुन्हा केल्याची आतापर्यंत समोर आलेल्या पुराव्यांवरून मला १०० टक्के खात्री झाली आहे. गुन्हा सिद्ध झाला तर तिला फाशी द्या अशी मागणी सोनमचा भाऊ गोविंद रघुवंशी यांनी बुधवारी केली.

सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
शिलाँग - मेघालयात हनिमूनदरम्यान पतीची हत्या केल्याप्रकरणी अटक केलेल्या त्याची पत्नी सोनम हिनेच हा गुन्हा केल्याची आतापर्यंत समोर आलेल्या पुराव्यांवरून मला १०० टक्के खात्री झाली आहे. गुन्हा सिद्ध झाला तर तिला फाशी द्या अशी मागणी सोनमचा भाऊ गोविंद रघुवंशी यांनी बुधवारी केली. तिच्याशी माहेरच्या लोकांनी नातेसंबंध तोडले आहेत. सोनम रघुवंशी व तिच्या चार सहकाऱ्यांना शिलाँग येथील न्यायालयाने बुधवारी आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
सोनम रघुवंशीचा भाऊ गोविंद यांनी म्हटले आहे की, माझ्या बहिणीनेच राजा रघुवंशीची हत्या केली, याची आतापर्यंत समोर आलेल्या पुराव्यांवरून मला १०० टक्के खात्री झाली आहे. तिच्यावरचा गुन्हा सिद्ध झाला, तर तिला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, अशीही त्यांनी मागणी केली. सोनम आणि राजा यांचा विवाह ११ मे रोजी इंदूरमध्ये झाला होता आणि २० मे रोजी ते गुवाहाटीमार्गे मेघालयात पोहोचले. २ जून रोजी राजाचा मृतदेह वेसॉडोंग धबधब्याजवळील खोल दरीत आढळला. त्यानंतर सोनमचा शोध सुरू झाला.
शारीरिक संबंधाआधी देवीला नैवेद्य लागेल
विवाहानंतर शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याआधी गुवाहाटीतील कामाख्या मंदिरात जाऊन देवीला नैवेद्य अर्पण करावा लागेल, असे सोनमने आपला पती राजा रघुवंशीला सांगितले होते, अशी माहिती तपासात उघड झाली आहे.
हनिमूनसाठी फिरायला जाण्याचे ठरवल्यानंतर हत्या करण्याचा कट सोनम आणि तिच्या प्रियकराने रचला. मेघालयातील एकांत जागी राजाची हत्या करण्यात आली.
जेव्हा सोनमला एसआयटीपुढे उभे करण्यात आले, तेव्हा ती रडू लागली. तिने प्रियकर राजच्या मदतीने हत्येची योजना आखल्याचेही कबूल केले. राजने याआधीच, म्हणजे एक दिवस आधीच, गुन्हा कबूल केला होता.