दिल्लीत पावसाचा धुमाकूळ, पाण्यात बुडून दोन मुलांसह तिघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2024 21:04 IST2024-06-29T21:04:02+5:302024-06-29T21:04:18+5:30
Rain In Delhi: मागच्या दोन तीन दिवसांपासून दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस पडत असून, पावसामुळे दिल्लीतील जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पावसामुळे दिल्लीकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

दिल्लीत पावसाचा धुमाकूळ, पाण्यात बुडून दोन मुलांसह तिघांचा मृत्यू
मागच्या दोन तीन दिवसांपासून दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस पडत असून, पावसामुळे दिल्लीतील जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पावसामुळे दिल्लीकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. मात्र काही ठिकाणी दुर्घटनाही घडल्या आहेत. दिल्लीमध्ये मुसळधार पावसानंतर झालेल्या दोन वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये दोन लहान मुलांसह तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
पहिल्या दुर्घटनेत दिल्लीच्या आउटर नॉर्थ जिल्ह्यातील बादली ठाण्याअंतर्गत येणाऱ्या सिरसपूर येथे दोन मुले अंडरपासमध्ये साठलेल्या पाण्यात खेळण्यासाठी गेली होती. त्यांचा बुडून मृत्यू झाला. पाणी साठलेल्या खड्ड्यात त्यांचे मृतदेह सापडले आहेत. दोन्ही मुलांचं वय सुमारे ९ वर्षे एवढं होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दुसऱ्या दुर्घटनेमध्ये दिल्लीतील ओखला येथे ओखला अंडरपासमध्ये साठलेल्या पाण्यात बुडाल्याने ६० वर्षांच्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बादली येथील घटना दुपारी २.३० च्या सुमारास घडली आहे. प्राथमिक तपासामध्ये बुडून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मेट्रो जवळच्या अंडरपासमध्ये २.५ ते ३ फूट पाणी साठलेलं होतं. फायर ब्रिगेडने शोध घेतल्यावर २ मुलांचे मृतदेह सापडले.