काही दिवसांपूर्वी निसर्गाने देशाचे सरळसरळ दोन भाग केले होते. उत्तर भारतात कडाक्याचा उन्हाळा तर महाराष्ट्रापासून खालच्या कोकणपट्ट्यात पावसाळा. मान्सून यंदा तसा आठवडाभर आधीच दाखल झाला आहे. परंतू, खरे आश्चर्य दिल्ली, नोएडा भागातील पावसाचे आहे. उन्हाळ्यात दिल्लीत आज पहाटे एवढा पाऊस झाला की बहुतांश ठिकाणी पाणी तुंबलेले आहे.
दिल्ली-एनसीआरमध्ये रविवारी पहाटे वादळ आणि जोरदार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. मिंटो रोड, एअरपोर्ट टर्मिनल १ तसेच मोतीबागमध्ये पाणी साचल्याने अडचण निर्माण झाली आहे. यामुळे रविवार असला तरी अनेक भागातील वाहतूक प्रभावित झाली आहे.
काही वाहने पाण्यात गेली आहेत. पहाटे तुफान पावसाला सुरुवात झाल्याने दिल्लीचा पारा उतरला आहे. अनेकांनी या अवकाळी पावसाचे व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून दिल्लीत भर उन्हाळ्यात एवढा पाऊस पडताना कधी पाहिला नसल्याचे म्हटले आहे. धौला कुआ भागात वाहतूक कोंडी झाली आहे, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनांची गती मंदावली आहे.
१०० हून अधिक विमानउड्डाणे प्रभावित झाली आहेत. २५ हून अधिक विमानफेऱ्या दुसरीकडे वळविण्यात आल्या आहेत. अनेक विमानांच्या फेऱ्यांना विलंब होत आहे. खराब हवामानामुळे रात्रीच्या वेळी उड्डाण करणारी विमाने विलंबाने होती, त्यांचाही लोड असल्याचे विमानतळ प्रशासनाने सांगितले आहे.
वादळी पावसामुळे दिल्लीतील काही भागातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. टाटा पावरनुसार काही अनुचित घडू नये म्हणून काही भागातील वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे. झाडाच्या फांद्या देखील वीज वाहिन्यांवर पडल्याने वीज पुरवठा खंडीत झाला आहे.