...तर कारवाई करणार; मंदिर खाली करण्यासाठी रेल्वेनं हनुमानजींना पाठवली नोटीस! दिली 10 दिवसांची मुदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 16:22 IST2022-10-11T16:21:38+5:302022-10-11T16:22:35+5:30
या नोटिशीत, आपले मंदीर सरकारी जमिनीवर अवैधरित्या बनवण्यात आले आहे. नोटिशीच्या 10 दिवसांच्या आत ही जमीन खाली करावी. अन्यथा आपल्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे म्हणण्यात आले आहे.

...तर कारवाई करणार; मंदिर खाली करण्यासाठी रेल्वेनं हनुमानजींना पाठवली नोटीस! दिली 10 दिवसांची मुदत
आपण अनेकवेळा सरकारी विभागाकडून सर्वसामान्यांना नोटीस दिल्याचे ऐकले असेल. पण कधी एखाद्या सरकारी विभागाने थेट देवालाच नोटीस पाठवल्याचे कधी ऐकले का? मात्र, अशी एक घटना नुकतीच समोर आली आहे. देवाला पाठवण्यात आलेल्या या नोटिशीत, आपले मंदीर सरकारी जमिनीवर अवैधरित्या बनवण्यात आले आहे. नोटिशीच्या 10 दिवसांच्या आत ही जमीन खाली करावी. अन्यथा आपल्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे म्हणण्यात आले आहे.
ही घटना झारखंडमध्ये गडली आहे. झारखंड रेल्वे विभागाने भगवान हनुमानजींना नोटिस जारी केली आहे. तसेच 10 दिवसांच्या आत मंदिर रेल्वेच्या जमिनीवरून हटविण्याचे निर्देश दिले आहेत. रेल्वे विभागाकडून अगदी फिल्मी अंदाजात ही नोटीस चिकटवण्यात आली आहे. या नोटिशीसंदर्भात स्थानिक लोकांनी संताप व्यक्त केला आहे. जाणून बुजून अशा पद्धतीने नोटीस चिकटवून आमच्या भावना दुखावल्या जात आहेत, असे लोकांनी म्हटले आहे.
रेल्वे विभागाने देवालाच जारी केली नोटीस -
खरे तर ही घटना, झारखंडमधील कोयला नगरी धनबाद जिल्ह्यात असलेल्या बेकारबांध कॉलोनी येथे घडली आहे. रेल्वेने येथील हनुमान मंदिरात एक नोटिस चिकटवली आहे. ही नोटीस बेकार बांध कॉलोनीत रेल्वेच्या जागेवर अवैध कब्जा केल्याचे म्हणत, पूर्व मध्य रेल्वेच्या सहाय्यक अभियंत्याकडून लावण्यात आली आहे. या घटनेनंतर, स्थानिक लोक संतप्त झाले असून, रेल्वेकडून हिंदूंच्या भावना दुखावण्यासाठी जाणूनबुजून हे कृत्य करण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे.