'एसी-थ्री टियर'मध्ये प्रवाशासोबत कुत्रा! रेल्वेतून नेता येतो का? व्हिडिओ व्हायरल होताच रेल्वे 'सेवा' झाली सक्रिय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 12:05 IST2025-12-11T12:04:27+5:302025-12-11T12:05:05+5:30
Railway Pet Rules 3AC Dog Traveling: पश्चिम बंगालमधील सियालदह ते आनंद विहारदरम्यान धावणाऱ्या १२३२९ संपर्क क्रांती एक्सप्रेसमधील हा व्हिडिओ आहे. ट्रेनच्या बी-१ कोचमध्ये एका कुटुंबाने नियमांचे उल्लंघन करत आपला पाळीव कुत्रा सोबत आणला होता.

'एसी-थ्री टियर'मध्ये प्रवाशासोबत कुत्रा! रेल्वेतून नेता येतो का? व्हिडिओ व्हायरल होताच रेल्वे 'सेवा' झाली सक्रिय
भारतीय रेल्वेच्या एसी-थ्री टियर कोचमध्ये एका प्रवाशाने आपल्या पाळीव कुत्र्यासोबत प्रवास केल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला, ज्यामुळे रेल्वे प्रशासनाला त्वरित कारवाई करावी लागली.
पश्चिम बंगालमधील सियालदह ते आनंद विहारदरम्यान धावणाऱ्या १२३२९ संपर्क क्रांती एक्सप्रेसमधील हा व्हिडिओ आहे. ट्रेनच्या बी-१ कोचमध्ये एका कुटुंबाने नियमांचे उल्लंघन करत आपला पाळीव कुत्रा सोबत आणला होता. कुत्रा थेट बर्थवर आणि प्रवाशांच्या जवळ बसलेला दिसल्याने एका जागरूक प्रवाशाने याचे फोटो आणि व्हिडिओ काढून 'X' प्लॅटफॉर्मवर शेअर केले.
तक्रारदाराने'रेल्वे मंत्री' आणि 'डीआरएम सियालदह' यांना टॅग करत, "3AC मध्ये कुत्रा नेण्यास परवानगी आहे का?" असा थेट प्रश्न विचारला. टीटीईने या नियमांचे उल्लंघन थांबवण्यासाठी कोणतीही कारवाई केली नाही, असाही आरोप त्याने केला होता.
पोस्ट व्हायरल होताच, रेल्वेच्या ग्राहक सेवा विभागाने तत्काळ प्रतिसाद दिला आणि तक्रारीवर पुढे कारवाई करण्यासाठी तक्रारदाराकडून पीएनआर क्रमांक आणि मोबाईल क्रमांक मागितला. या घटनेमुळे रेल्वेच्या नियमांविषयीची माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचलेली नसते आणि ती पोहोचवण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
रेल्वेचे नियम काय सांगतात?
भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार, एसी-३ टियर, एसी-२ टियर, स्लीपर क्लास किंवा चेअर कार यांसारख्या सामान्य प्रवाशी वर्गात पाळीव प्राण्यांना (कुत्रा) सोबत नेण्याची मुळीच परवानगी नाही.
फक्त एसी फर्स्ट क्लास मध्येच, जर प्रवाशाने संपूर्ण कूप (दोन सीट) किंवा संपूर्ण केबिन (चार सीट) आरक्षित केले असेल, तरच पाळीव कुत्र्याला प्रवासाची परवानगी मिळते. अन्यथा, प्राण्यांना रेल्वेच्या लगेज व्हॅन किंवा ब्रेक व्हॅनमध्ये विशेष भाड्याने घेऊन जावे लागते.