देशात 2026 पासून धावणार पहिली बुलेट ट्रेन, रेल्वेमंत्र्यांनी केली मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 16:26 IST2022-10-07T15:31:44+5:302022-10-07T16:26:52+5:30
bullet train : जागतिक दर्जाचे रेल्वे स्टेशन बांधण्यात येणार आहे. याशिवाय, 199 स्टेशन जागतिक दर्जाची करण्यासाठी मास्टर प्लॅन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

देशात 2026 पासून धावणार पहिली बुलेट ट्रेन, रेल्वेमंत्र्यांनी केली मोठी घोषणा
नवी दिल्ली : रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी अहमदाबाद दौऱ्यावर असताना बुलेट ट्रेनबाबत मोठी घोषणा केली आहे. देशातील पहिली बुलेट ट्रेन 2026 मध्ये धावणार असल्याचे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे. तसेच, सध्या बुलेट ट्रेनचे ट्रॅक 92 पिलर तयार करण्यात आले आहेत. जागतिक दर्जाचे रेल्वे स्टेशन बांधण्यात येणार आहे. याशिवाय, 199 स्टेशन जागतिक दर्जाची करण्यासाठी मास्टर प्लॅन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. याअंतर्गत अहमदाबाद रेल्वे स्टेशन जागतिक दर्जाचे बनवण्यात येणार आहे.
वंदे भारत एक्स्प्रेस दुर्घटनेबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, देशातील सर्व रेल्वे ट्रॅक अजूनही जमिनीवर आहेत. त्यामुळे गुरांचा प्रश्न कायम आहे. मात्र, अशा समस्यांना तोंड देण्यासाठी गाड्यांचे डिझाइन तयार केले जात आहेत. कालच्या घटनेनंतरही वंदे भारत ट्रेनला काहीच झाले नाही. पुढचा भाग दुरुस्त केल्यानंतर पुन्हा गाडी सुरू झाली आहे.
मुंबईहून गांधीनगरला जाणारी देशातील पहिली हाय-स्पीड ट्रेन असलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसला गुरुवारी अहमदाबादपूर्वी बटवा आणि मणिनगर दरम्यान एक म्हैस धडकली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रेनचा पुढील भाग तुटला आहे. आता ही गाडी पूर्णपणे दुरुस्त करून परत आणण्यात आली आहे. काल सकाळी अकराच्या सुमारास हा अपघात झाला. वंदे भारत एक्सप्रेस सध्या फक्त तीन मार्गांवर धावत आहे.
गुजरातमध्ये तयार होणार 5G लॅब
गुजरातमध्ये 5G लॅब तयार केली जाईल, असे अहमदाबादमध्ये अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. दरम्यान, अश्विनी वैष्णव हे आयटी आणि दूरसंचार मंत्रीही आहेत. नुकतेच त्यांनी इंडियन मोबाईल काँग्रेसमध्ये सांगितले होते की, देशात 5G टेक्नॉलॉजीने सुसज्ज असलेल्या 100 लॅबची स्थापना करण्याची सरकारची योजना आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी किमान 12 लॅबचा वापर केला जाणार असून इतर प्रयोगशाळांचा वापर नवीन प्रयोगांसाठी केला जाणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"