Video: 'अमृत भारत एक्सप्रेस'च्या पायलट सीटवर रेल्वेमंत्री; आतमधून दाखवली संपूर्ण ट्रेन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 17:18 IST2023-12-27T17:03:52+5:302023-12-27T17:18:42+5:30
२२ जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीराम प्राणपतिष्ठा सोहळा मोठ्या दिमाखात होत आहे.

Video: 'अमृत भारत एक्सप्रेस'च्या पायलट सीटवर रेल्वेमंत्री; आतमधून दाखवली संपूर्ण ट्रेन
रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेल्या वंदे भारत एक्सप्रेसला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गतीमान आणि वातानुकूलित रेल्वेसेवाचा आनंद घेण्यासाठी प्रवासी उत्सुक असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळेच, वंदे भारत ट्रेनलाही प्रवाशांची गर्दी होत आहे. बुलेट ट्रेनचे स्वप्न पाहणाऱ्या भारत देशात वंदे भारतनंतर आता अमृत भारत एक्सप्रेस सुरू होत आहे. ३० डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमृत भारत एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखवणार आहेत. दिल्ली ते दरभंगा मार्गावर ही रेल्वे धावणार आहे. उत्तर प्रदेशच्या अयोध्या ते बिहारमधील सीतामढी मार्गास ही ट्रेन जोडणार आहे.
२२ जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीराम प्राणपतिष्ठा सोहळा मोठ्या दिमाखात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर अयोध्येतील दळणवळण गतीमान केलं जात असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते ३० डिसेंबर रोजी अयोध्येतील नवीन विमानतळाचे उद्घाटन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे याच दिवशी अमृत भारत रेल्वेलाही व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगद्वारे हिरवी झेंडी दाखवण्यात येणार आहे. वंदे भारत ट्रेनप्रमाणेच ही ट्रेनही सुसज्ज आणि प्रशस्त बैठकव्यवस्थेची असणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या ट्रेनमधील सुविधांचा आणि ही ट्रेन आतमधून कशी आहे, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या तो व्हिडिओ प्रवाशांच्या पसंतीस उतरत आहे.
अमृत काल की अमृत भारत ट्रेन! pic.twitter.com/yegGEydJU5
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) December 26, 2023
अयोध्या ते सीतामढी म्हणजेच रामजन्मभूमी ते सीतामातेच्या गावाला जोडणाऱ्या ह्या ट्रेनला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व असणार आहे. गोरखपूर-मुजफ्फरनगर मार्गावरुन ही ट्रेन दिल्ली ते दरभंगा अशी धावणार आहे. सध्या रेल्वेकडून या रेल्वेमार्गाच्या थांब्याबाबत आणि प्रवास भाड्याबाबत चर्चा सुरू आहे. नुकतेच अमृत भारत ट्रेनची यशस्वी चाचणी झाली असून दिल्ली ते दानापूर मार्गावर ही चाचणी घेण्यात आली. या ट्रेनमध्ये २२ कोच असून १८३४ प्रवासी सहजपणे प्रवास करू शकतात. या रेल्वेचा स्पीड प्रति तास १३० किमी असणार आहे. दरम्यान, सध्या भगव्या रंगात आणि ग्रे कलरमध्ये ही ट्रेन बनवण्यात आली आहे.