प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; आता किती पैसे मोजावे लागणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 14:01 IST2025-12-21T14:01:27+5:302025-12-21T14:01:42+5:30
Railway Fare Hike : रेल्वेने लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता प्रवासासाठी जास्त पैसे खर्च करावे लागणार आहेत.

प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; आता किती पैसे मोजावे लागणार?
भारतीय रेल्वेने मेल-एक्स्प्रेसच्या तिकिटांच्या दरात वाढ करण्याची मोठी घोषणा केली आहे. रेल्वेकडून ही भाडेवाढ २६ डिसेंबर २०२५ पासून लागू केली जाणार आहे. विशेषतः रेल्वेने लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता प्रवासासाठी जास्त पैसे खर्च करावे लागणार आहेत.
रेल्वेने २६ डिसेंबर २०२५ पासून लागू होणाऱ्या नवीन भाडे रचनेची घोषणा केली आहे. यामध्ये 'ऑर्डिनरी क्लास'मध्ये २१५ किलोमीटरपेक्षा कमी प्रवासासाठी कोणताही अतिरिक्त भार टाकण्यात आलेला नाही, म्हणजेच या अंतरासाठी भाड्यात कोणतीही वाढ केलेली नाही. मात्र २१५ किलोमीटरपेक्षा जास्त प्रवासासाठी ऑर्डिनरी क्लासमध्ये १ पैसा प्रति किलोमीटर आणि मेल/एक्सप्रेसच्या नॉन-एसी व एसी क्लाससाठी २ पैसे प्रति किलोमीटर भाडेवाढ लागू होणार आहे.
भाडेवाढीतून ६०० कोटींची कमाई
भारतीय रेल्वेने केलेल्या या भाडेवाढीमुळे रेल्वेच्या तिजोरीत मोठी भर पडणार आहे. या बदलामुळे सुमारे ६०० कोटी रुपयांहून अधिक कमाई होण्याची अपेक्षा रेल्वेने व्यक्त केली आहे. तिकीट दरातील या बदलानुसार, जर एखादा प्रवासी ५०० किलोमीटरचा प्रवास नॉन-एसी ट्रेनने करत असेल, तर त्याला सध्याच्या तिकीट दरापेक्षा १० रुपये जास्त द्यावे लागतील.
दिल्ली ते पाटणा प्रवासाचं भाडं
दिल्ली ते पाटणा हे अंतर साधारण १००० किलोमीटर आहे. सध्या DBRT राजधानी ट्रेनमध्ये थर्ड एसीचा प्रवास करण्यासाठी २३९५ रुपये भाडं आहे. २६ डिसेंबरपासून लागू होणाऱ्या २ पैसे प्रति किलोमीटरच्या वाढीमुळे तिकिटाच्या दरात थेट २० रुपयांची वाढ होईल.
दिल्ली ते मुंबई प्रवासासाठी खर्च
रेल्वेने निश्चित केलेल्या नव्या दरानुसार दिल्ली ते मुंबई प्रवासाच्या भाड्याचे गणित मांडल्यास हे अंतर साधारण १३८६ किलोमीटर आहे. सध्या 'CSMT राजधानी एक्स्प्रेस'मध्ये ३-एसीचं भाडे ३१८० रुपये आहे. यामध्ये २ पैसे प्रति किलोमीटरच्या वाढीनंतर भाड्यात साधारण २७ रुपयांची वाढ होईल आणि तिकीट ३२०७ रुपये होईल.
या वर्षातील दुसरी भाडेवाढ
भारतीय रेल्वेने तिकीट दरात केलेली ही या वर्षातील दुसरी वाढ आहे. यापूर्वी १ जुलै रोजी रेल्वे भाडे वाढवण्यात आलं होतं. १ जुलैपासून करण्यात आलेली वाढही तितकीच होती. त्यावेळी विविध कॅटेगिरीतील गाड्यांचं भाडं वाढवण्यात आलं होतं, ज्यात मेल आणि एक्स्प्रेससाठी १ पैसा प्रति किलोमीटर, तर एसी ट्रेनसाठी २ पैसे प्रति किलोमीटर अशी वाढ करण्यात आली होती.