राहुल यांनी केला जनादेशाचा अपमान, जावडेकर यांचा प्रतिहल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:37 IST2017-12-21T00:37:07+5:302017-12-21T00:37:27+5:30
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालावर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी केलेल्या भाष्यावर भाजपने दुस-या दिवशी जोरदार प्रतिहल्ला केला आहे.

राहुल यांनी केला जनादेशाचा अपमान, जावडेकर यांचा प्रतिहल्ला
नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालावर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी केलेल्या भाष्यावर भाजपने दुस-या दिवशी जोरदार प्रतिहल्ला केला आहे.
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, विकासाला वेडे म्हणणारे विकासाच्या मॉडेलला समजून घेऊ शकत नाहीत. गांधी यांनी केलेले आरोप म्हणजे जनादेशाचा अपमान आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सतत पराभूत होत आहे व ते निराशेमुळे काहीही बोलत आहेत.
गुजरातेत भाजपला झटका बसल्याची गांधी यांनी केलेली टीका म्हणजे ते त्यांच्या पक्षाच्या पराभवाला समजून घेऊ शकत नाहीत किंवा त्याची व्याख्या बदलू बघत आहेत, असे जावडेकर म्हणाले. हे जर
त्यांना समजू शकत नसेल तर
सुधारणा होण्याची कोणतीही शक्यता नाही, असेही त्यांनी सांगितले. हरयाणा, जम्मू-काश्मीर, मणिपूर, आसाम, उत्तराखंड, झारखंड, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व तेलंगणमधील पराभवाचा दाखला देऊन जावडेकर म्हणाले की, गांधी पराभवालाच विजय म्हणत असतील, तर त्यांना असे यश लखलाभ होवो. पुढेही निवडणुका आहेत. त्यातही त्यांचा असाच पराभव होईल. फटका काँग्रेसला बसला हे त्यांनी समजून घ्यायला हवे.
सत्तेच्या अहंकारामुळे काँग्रेसला पराभव दिसत नाही. गुजरातने स्पष्ट संदेश दिला आहे की विकास यात्रेपासून दूर जाऊ नका. गुजरात जातीयवादाच्या गाळात फसणार नाही. मोदी यांना पराभूत कसे करावे, हे काँग्रेस व राहुल गांधी यांना समजलेच नाही, असे जावडेकर म्हणाले.
राफेलमध्ये क्वात्रोची नाही-
राफेल विमान व्यवहारावर राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नावर जावडेकर म्हणाले की हा व्यवहार बोफोर्सचा नाही तर राफेलचा आहे. हा करार भारत व फ्रान्स यांच्यातील आहे. यात क्वात्रोची मध्यस्थ नाही. जे बोफोर्स करीत राहिले व ज्यांच्या संरक्षण साहित्य खरेदी व्यवहारांत कमिशनची संस्कृती फोफावली त्यांना पारदर्शक व्यवहार समजणार नाहीत.