राहुल गांधी मुस्लीम लीगमुळेच वायनाडमधून जिंकले; औवेसींचा इंडिया आघाडीवर प्रहार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2023 20:13 IST2023-09-19T20:11:12+5:302023-09-19T20:13:21+5:30
देशात भाजपा आणि मोदी सरकारविरुद्ध सर्वपक्षीय विरोधक एकत्र आले असून इंडिया आघाडीची स्थापन करण्यात आली आहे.

राहुल गांधी मुस्लीम लीगमुळेच वायनाडमधून जिंकले; औवेसींचा इंडिया आघाडीवर प्रहार
नवी दिल्ली - केंद्र सरकारने विशेष अधिवेशन बोलावलं असून ५ दिवसांच्या या अधिवेशनातील दुसऱ्या दिवशी महत्त्वाचं विधेयक संसदेत मांडण्यात आलं आहे. महिला आरक्षण विधेयकावरुन सध्या देशभरात मोदी सरकारची चर्चा सुरू आहे. दुसरीकडे इंडिया आघाडीने राष्ट्रीय पातळीवर भाजप आणि मोदींना विरोध करत एकजुट केली आहे. इंडिया आघाडीच्या या बैठकीला एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन औवेसींना बोलावण्यात आले नाही. त्यामुळे, त्यांची एकला चलो रे.. अशी त्यांची भूमिका दिसून येते. मात्र, इंडिया आघाडीवर त्यांनी जोरदार प्रहार केला. तसेच, काँग्रेस नेते राहुल गांधींवरही निशाणा साधला.
देशात भाजपा आणि मोदी सरकारविरुद्ध सर्वपक्षीय विरोधक एकत्र आले असून इंडिया आघाडीची स्थापन करण्यात आली आहे. मात्र, या इंडिया आघाडीत एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीला स्थान नसल्याचे दिसून येते. त्यावरुन, दोन्ही पक्षांनी स्पष्टपणे नाराजी उघड करत या आघाडीवर निशाणा साधला आहे. खासदार असदुद्दीन औवेसी यांनी आता इंडिया आघाडीवर प्रहार करताना, मला देणं घेणं नाही, इंडिया आघाडी कोपऱ्यात जाऊ दे.. असे विधान केले. तसेच, केवळ हिंदू मतं नाराज होतील, हिंदूंची मतं आपल्याल मिळणार नाहीत, म्हणून इंडिया आघाडीत त्यांनी आपणास विचारणा केली नसल्याचं औवेसींनी म्हटलंय.
राहुल गांधींनी दोन ठिकाणांहून निवडूक लढवली. अमेठी मतदारसंघातून ते पराभूत झाले. मात्र, वायनाड येथून ते हरले. वायनाडमधून ते का जिंकले, माझी भाजपासोबत तिथं डिल झालं नाही, मग ते वायनाडमधून कसे जिंकले. कारण, तिथे मुस्लीम लीग आहे. मुस्लीम लीगने राहुल गांधींना बुडताना वाचवले, असे म्हणत औवेसींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केलाय.
दरम्यान, मुसलमांनी निवडणुकीत उभं राहायला पाहिजे. मग, ती निवडणूक सरपंचपदाची असो किंवा संसदेचं असो. जोपर्यंत मुसलमान निवडणूक लढणार नाही, तोपर्यंत तुम्ही जिंकणार नाहीत. तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्हाला अगोदर एक-दोन वेळेस हरावं लागेल, असे म्हणत औवेसींनी मुस्लिमांना निवडणूक लढवण्यासाठी पुढे येण्याचं आवाहन केलंय.