राहुल गांधी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवणार नाहीत, काँग्रेसनं सांगितलं 'RSS कनेक्शन'!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 21:37 IST2023-01-17T21:36:34+5:302023-01-17T21:37:18+5:30
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो यात्रा’ 7 सप्टेंबर रोजी तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून सुरू झाली आहे. राहुल गांधी यांच्या हस्ते श्रीनगरमध्ये तिरंगा ध्वज फडकवून या यात्रेची सांगता होईल.

राहुल गांधी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवणार नाहीत, काँग्रेसनं सांगितलं 'RSS कनेक्शन'!
काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रे'ला संपूर्ण देशभरात जबरदस्त प्रतिसात मिळत आहे. ही यात्रा लवकरच श्रीनगरमध्येही पोहोचत आहे. यातच, यात्रेचे नेतृत्व करत असलेले काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधीजम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे असलेल्या ऐतिहासिक लाल चौकात भारताचा तिरंगा ध्वज फडकवणार नाहीत, अशी माहिती काँग्रेस पक्षाने दिली आहे. जम्मू-काश्मीरच्या अखिल भारतीय काँग्रेस कमेटी (एआयसीसी) प्रभारी आणि पक्षाच्या खासदार रजनी पाटील मंगळवारी बोलताना म्हणाल्या, राहुल गांधी 30 जानेवारीला लाल चौकात नव्हे, तर श्रीनगरमधील काँग्रेस मुख्यालयात भारतीय ध्वज तिरंगा फडकवतील. एवढेच नाही, तर लाल चौकात तिरंगा फडकवणे हा आरएसएसच्या अजेंड्याचा भाग होता, असेही त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो यात्रा’ 7 सप्टेंबर रोजी तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून सुरू झाली आहे. राहुल गांधी यांच्या हस्ते श्रीनगरमध्ये तिरंगा ध्वज फडकवून या यात्रेची सांगता होईल. ही यात्रा आतापर्यंत तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमधून गेली आहे.
यावेळी राहुल गांधीच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यासंदर्भात विचारले असता पाटील म्हणाल्या, "लाल चौकात तिरंगा फडकवण्याच्या आरएसएसच्या अजेंड्यावर आमचा विश्वास नाही. तेथे तो (तिरंगा) आधीच डौलाने फडकत आहे." या यात्रेच्या समारोपाचा मुख्य कार्यक्रम शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर (SKICC), श्रीनगर येथे आयोजित करण्यात येईल.
पाटील यांनी सांगितले की, ‘‘ही यात्रा गुरुवारी सायंकाळी पंजाबमधून लखनपूरमार्गे जम्मू-काश्मीरमध्ये दाखल होईल. सायंकाळी 5.45 ते 6.15 दरम्यान महाराजा गुलाबसिंग यांच्या पुतळ्याजवळ ध्वजारोहण होईल. 23 जानेवारीला ही यात्रा जम्मूत दाखल होईल. शहरात रॅली काढण्याचा आमचा विचार असून त्यासाठी आम्ही प्रशासनाकडे परवानगी मागितली आहे. प्रशासन परवानगी देईल, अशी अपेक्षा आहे.