'व्होटचोरी' रॅलीत राहुल गांधी यांचा इशारा, निवडणूक आयोगाला वाचवणारा नवा कायदा बदलू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 11:32 IST2025-12-15T11:31:40+5:302025-12-15T11:32:36+5:30
निवडणूक आयोग सरकारसाठी काम करतो, सत्तेवर आल्यावर कारवाई!

'व्होटचोरी' रॅलीत राहुल गांधी यांचा इशारा, निवडणूक आयोगाला वाचवणारा नवा कायदा बदलू
नवी दिल्ली: रामलीला मैदानावर रविवारी आयोजित केलेल्या 'व्होट चोरी - गद्दी छोड' रॅलीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधत मुख्य निवडणूक आयोग आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू व विवेक जोशी यांची नावे घेतली. हे अधिकारी भाजपसाठी काम करत असून, सत्यासाठी आग्रही राहू, भाजप व संघपरिवाराच्या सत्तेला पराभूत करू, असे राहुल गांधी म्हणाले.
भाजप व संघ परिवाराकडे सत्ता आहे. त्यामुळे ते मत चोरी करू शकतात. भाजपने बिहार निवडणुकांत १० हजार रुपये मतदारांना वाटले; पण निवडणूक आयोगाने या पक्षाला कोणतेही कारण विचारले नाही. हा निवडणूक आयोग पंतप्रधानांसाठी काम करतो. पंतप्रधानांनी निवडणूक आयोगाला वाचवण्यासाठी नवा कायदा आणला आहे. आम्ही सत्तेवर आल्यावर हा कायदा बदलू आणि या अधिकाऱ्यांवर कारवाई करू, असे राहुल गांधी म्हणाले. आम्ही सत्य व अहिसेंवर ठाम राहू व केंद्रातील सत्तेचा पराभव करू, असा विश्वास राहुल यांनी व्यक्त केला. भाजप, संघपरिवार राज्य घटनेला उद्ध्वस्त करत आहेत, अशी टीका करत खर्गे यांनी त्यांचे प्रयत्न आम्ही हाणून पाडू, असे सांगितले.
भाजपला सत्तेवरून हद्दपार केले पाहिजेत, खगैंची टीका
रॅलीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपवर तीव्र शब्दांत हल्ला केला. मत चोरी करणारे भाजप गद्दार असून घटनेने दिलेला मताचा अधिकार वाचवण्यासाठी या सरकारला सत्तेवरून हाकलून दिले पाहिजे, असे खर्गे यांनी आवाहन केले.
काँग्रेसने अनेक निवडणुका हरल्या असल्या तरी काँग्रेसचा विचार देशात अद्याप जिवंत आहे. गोळवलकर, मोहन भागवत यांची विचारसरणी आणि मनुस्मृतीतील विचार देशाला उद्ध्वस्त करत असून या देशाला फक्त काँग्रेसची विचारसरणीच वाचवू शकते असा दावा मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे.
मतपत्रिकेवर निवडणुका घेतल्यास भाजप जिंकूच शकत नाही : प्रियंका
'व्होट चोरी..'च्या रॅलीत काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांनी देशातील निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याची मागणी केली. जर देशात प्रामाणिकपणे निवडणुका व त्याही मतपत्रिकेवर घेतल्या तर भाजप कधीही निवडून येऊ शकत नाहीत, असे प्रियंका गांधी म्हणाल्या. भाजपचा आत्मविश्वास कमी होत चालला आहे.
केवळ निवडणूक आयोगामुळे निवडून येत आहेत. उत्तर प्रदेशांत तीन कोटी मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. बिहारमध्ये ६५ लाख मतदारांची नावे वगळून आचार संहिता असतानाही मतदारांच्या खात्यात १० हजार रुपये जमा करून मते चोरण्यात आली. या निवडणुकांचे निकाल संशयास्पद आहेत.
मत चोरीला मदत करणाऱ्या तीन निवडणूक आयुक्तांची नावे विसरू नका, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.
काँग्रेस आमदाराने वाचवले प्राण
बेंगळूरु : गोव्याहून नवी दिल्लीला जाणाऱ्या विमानात एका अमेरिकन महिला सहप्रवाशाला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर कर्नाटकच्या माजी आमदार आणि व्यवसायाने डॉक्टर असलेल्या अंजली निंबाळकर यांनी त्वरित वैद्यकीय मदत पुरवून तिचे प्राण वाचवले.
एआयसीसीच्या सचिव तथा गोवा, दमण-दीव व दादरा नगर हवेलीच्या सहप्रभारी डॉ. अंजली निंबाळकर काँग्रेसने आयोजित केलेल्या 'वोट चोरी' रॅलीत सहभागी होण्यासाठी प्रवास करत होत्या.
त्यावेळी एक अमेरिकन महिला सहप्रवासी बेशुद्ध पडली. ही वैद्यकीय आणीबाणी लक्षात येताच डॉ. निंबाळकर यांनी तत्काळ धाव घेतली आणि उपचार करत प्राण वाचवले.