ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 15:51 IST2025-07-30T15:50:21+5:302025-07-30T15:51:01+5:30

Rahul Gandhi vs Narendra Modi: भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामात डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका असल्याची टीका विरोधक सातत्याने करत आहेत.

Rahul Gandhi vs Narendra Modi: Now Trump will put pressure on Modi over trade deal; Rahul Gandhi's blunt criticism | ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका

ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका

Rahul Gandhi vs Narendra Modi: काँग्रेस नेते राहुल गांधीऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धविरामारुन पंतप्रधान मोदींवर सतत टीका करत आहेत. काल त्यांनी लोकसभेत म्हटले की, पंतप्रधान मोदी स्पष्टपणे सांगू शकले नाहीत की, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मध्यस्थीचा दावा खोटा आहे. आज पुन्हा एकदा पंतप्रधानांवर टीका करताना त्यांनी म्हटले की, पंतप्रधान मोदी ट्रम्प यांचे नाव घेऊ शकत नाहीत, कारण त्यांना भीती आहे की, अमेरिकन अध्यक्ष संपूर्ण सत्य सांगतील.

ट्रम्प मोदींवर दबाव टाकणार
संसदेच्या परिसरात पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी दावा केला की, पंतप्रधान मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव घेतले नाही, कारण त्यांना माहित आहे की, जर त्यांनी तसे केले, तर ट्रम्प संपूर्ण सत्य उघड करतील. ट्रम्प खोटं बोलत आहेत, असे मोदी म्हणालेच नाही. काय घडले आहे हे सर्वांना माहिती आहे. सध्या ट्रम्प यांना भारतासोबत व्यापार करार हवा आहे. आता यावरुनही ते मोदींवर दबाव आणतील, अशी बोचरी टीका राहुल यांनी केली.

ट्रम्प खोटं बोलत आहेत
या मुद्द्यावर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्र्यांवर टाळाटाळ केल्याचा आरोप केला. डोनाल्ड ट्रम्प खोटं बोलत आहेत, असे मोदींनी थेट सांगावे, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.

कान उघडून ऐका, ट्रम्प आणि मोदींमध्ये एकही फोन कॉल झाला नाही
दरम्यान, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आज राज्यसभेतून पुन्हा एकदा स्पष्ट केले की, जगातील कोणत्याही नेत्याने भारताला ऑपरेशन थांबवण्यास सांगितले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात कोणतीही चर्चा झाली नाही. अमेरिका, सौदी अरेबियासह अनेक देशांशी आमची चर्चा झाली, सर्व कॉल रेकॉर्डवर आहेत. आम्ही सर्वांना हेच सांगितले की, जर पाकिस्तानला संघर्ष थांबवायचा असेल, तर त्यांनी आमच्या डीजीएमओ चॅनेलद्वारे विनंती करावी. १२ एप्रिल ते २२ जून या काळात पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात एकही फोन कॉल झाला नाही.

Web Title: Rahul Gandhi vs Narendra Modi: Now Trump will put pressure on Modi over trade deal; Rahul Gandhi's blunt criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.