Rahul Gandhi on Jagdeep Dhankhar: भारताचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे राजीनामा दिल्यानंतर माध्यमांमध्ये दिसले नाहीत. तसेच, राजीनाम्यानंतर त्यांची एकही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांकडून यावरुन सरकावर निशाणा साधत आहेत. आधी शिवसेना नेते संजय राऊत यांनी गृहमंत्री अमित शाहांना पत्र लिहून हेबियस कॉर्पस याचिका दाखल करण्याचे वक्तव्य केले. त्यानंतर आता यावर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
बुधवारी(दि.२०) इंडिया आघाडीच्या वतीने उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांच्यासाठी संसदेत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या दरम्यान, राहुल गांधींनी माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अचानक बेपत्ता होण्यावर आणि मौन बाळगण्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
उघडपणे बोलणारे पूर्णपणे गप्पराहुल म्हणाले, ज्या दिवशी उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिला, त्या दिवशी वेणुगोपाल यांनी मला फोन करून सांगितले की, उपराष्ट्रपती निघून गेले आहेत. त्यांच्या राजीनाम्यामागे एक मोठी कहाणी आहे, जी काही लोकांना माहित असेल आणि काहींना कदाचित माहित नसेल. प्रश्न असा आहे की, ते लपून का बसले आहेत? भारताचे उपराष्ट्रपती अशा परिस्थितीत का आहेत की, ते एक शब्दही बोलू शकत नाहीत? राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज पूर्णपणे गप्प का आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
आपण मध्ययुगीन काळात जगत आहोत बुधवारी पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना गंभीर गुन्हेगारी आरोपांवर अटक केल्यास आणि सलग ३० दिवस कोठडीत राहिल्यास पदावरून काढून टाकण्याची तरतूद असलेले विधेयक सभागृहात मांडण्यात आले. याबाबत विरोधी पक्षाकडून बराच गोंधळ झाला. राहुल गांधी यांनी या विधेयकावर बोलताना म्हटले की, आपण सध्या मध्ययुगीन काळात जगत आहोत. तेव्हा राजा आपल्या मर्जीने कोणालाही काढून टाकत असे. सध्या लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या व्यक्तीला काही किंमत नाही. जर तुमच्या आवडीचा चेहरा नसेल, तर ईडीला गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले जातात आणि निवडून आलेल्या नेत्याला ३० दिवसांत संपवले जाते, अशी टीकाही राहुल यांनी केली.