"ट्रम्प २५ वेळा युद्ध थांबवल्याचे म्हणाले, पण PM मोदी एकदाही...;" शस्त्रसंधीवरून राहुल गांधींनी सरकारला घेरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 14:09 IST2025-07-23T13:50:13+5:302025-07-23T14:09:31+5:30
भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष थांबवल्याचा दावा करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

"ट्रम्प २५ वेळा युद्ध थांबवल्याचे म्हणाले, पण PM मोदी एकदाही...;" शस्त्रसंधीवरून राहुल गांधींनी सरकारला घेरले
Rahul Gandhi on Operation Sindoor: पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचे प्राण गेल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिलं होतं. पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळांना भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांकडून लक्ष्य करण्यात आलं. यानंतर पाकिस्तानातूनही हल्ले करण्यात आले मात्र भारताने ते परतवून लावले. त्यानंतर पाकिस्तानने केलेल्या विनंतीनंतर हे युद्ध थांबवण्यात आलं. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये शस्त्रविराम घडवून आणल्याचे दावे करत आहेत. याचे पडसाद संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही उमटले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी डोनाल्ड ट्रम्प युद्धबंधी केल्याचा दावा कसा करु शकतात असा सवाल केला.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधक पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर यावरून आ्क्रमक झाले आहेत. सलग तिसऱ्या दिवशी सभागृहाचे कामकाज विस्कळीत झाले आहे. अशातच भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी केल्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या दाव्यांवरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला. डोनाल्ड ट्रम्प यांनी २५ वेळा युद्धबंदीसाठी मध्यस्थी केल्याचे म्हटलं, पण पंतप्रधान मोदी एकदाही बोलले नाहीत असं म्हणत राहुल गांधींनी जोरदार टीका केली. तसेच ऑपरेशन सिंदूरनंतर जगभरात कोणीही आपलं समर्थन केलं नसल्याचे राहुल गांधी म्हणाले.
"सरकारने ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे. पंतप्रधान परत आल्यानंतर चर्चा होईल. पण पंतप्रधानांचे उत्तर अद्याप प्रलंबित आहे. एकीकडे असं म्हटलं जातं की ऑपरेशन सिंदूर चालू आहे, आम्ही जिंकलो आहोत. दुसरीकडे, ट्रम्प सतत दावा करत आहेत की मी ऑपरेशन सिंदूर थांबवले आहे. पंतप्रधान कसं बोलू शकतील? ते म्हणतील का युद्धबंदी ट्रम्प यांनी केली होती? नाही, ते तसे म्हणणार नाहीत. ट्रम्प यांनी युद्धबंदीत मध्यस्थी केली हे सत्य आहे. हे फक्त युद्धबंदीबद्दल नाही, आम्हाला संरक्षण उद्योग, ऑपरेशन सिंदूर यावर चर्चा करायची आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी २५ वेळा युद्धबंदीत मध्यस्थी केल्याचे म्हटले आहे. हे करणारे ट्रम्प कोण आहेत? हे त्यांचे काम नाही, पण पंतप्रधानांनी यावर एकदाही उत्तर दिले नाही. हेच सत्य आहे, तुम्ही त्यापासून पळून जाऊ शकत नाही," असं राहुल गांधींनी म्हटलं.
यावेळी राहुल गांधी यांनी ऑपरेशन सिंदूरनंतर विविध देशांमध्ये गेलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळावरही भाष्य केलं. "त्यांनी आमच्या परराष्ट्र धोरणाच्या चिंधड्या उडवल्या आहेत. कोणत्याही देशाने आम्हाला पाठिंबा दिला नाही," असंही राहुल गांधी म्हणाले.