Rahul Gandhi: केंद्रीय राखीव पोलीस दल, अर्थात CRPF ने राहुल गांधींवर सुरक्षा प्रोटोकॉल तोडल्याचा आरोप केला आहे. CRPF ने याबाबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून चिंताही व्यक्त केली आहे. राहुल गांधी कुणालाही न सांगता मागील ९ महिन्यात ६ वेळा परदेश दौऱ्यावर गेले, असे या पत्रात सांगण्यात आले आहे. दरम्यान, आता या परदेश दौऱ्यावरुन भाजपने राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी कोणत्या गुप्त बैठका घेतात?
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले की, 'राहुल गांधी वारंवार परदेश दौऱ्यांमध्ये सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन करत असतील, तर काही प्रश्न उद्भवतात. परदेश दौऱ्यांमध्ये असे काय होते की, त्यांना स्वतःच्या सुरक्षेवर विश्वास नाही आणि ते प्रोटोकॉल तोडतात? परदेशातून काही साहित्य, मजकूर येते का? अशा चर्चा किंवा बैठका होत आहेत का, ज्यांची माहिती मिळू नये, म्हणून सुरक्षेशी तडजोड केली जात आहे?'
'यापूर्वी राहुल गांधींना एसपीजी सुरक्षा होती, तेव्हाही अशा चिंता उपस्थित झाल्या होत्या. परदेशात त्यांना अधिक सुरक्षित वाटते. उद्या काही घडले, तर सुरक्षा संस्थांना दोषी ठरवले जाईल. काँग्रेसने त्यांना विचारावे की, परदेश दौऱ्यांवर ते कोणत्या गुप्त बैठका घेतात, ज्यासाठी सुरक्षेचे उल्लंघन करावे लागते?' असे प्रश्न पूनावाला यांनी उपस्थित केले आहेत.
काय आहे प्रोटोकॉल?
येलो बुक प्रोटोकॉलनुसार उच्चस्तरीय श्रेणीतील सुरक्षा मिळालेल्या लोकांना त्यांच्या हालचालींबाबत सुरक्षा विंगला आधी सूचना द्यावी लागते. जेणेकरून पुरेसी व्यवस्था निश्चित केली जाईल. त्यात परदेश दौऱ्यांचाही समावेश असतो. CRPF चे व्हीव्हीआयपी सिक्युरिटी हेड सुनील जून यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना हे पत्र लिहिले. त्यात राहुल गांधी त्यांच्या सुरक्षेला गांभीर्याने घेत नाहीत. बहुतांश वेळा ते कुणालाही न सांगता परदेश दौऱ्यावर जातात, असे त्यांनी सांगितले.
३० डिसेंबर ते ९ जानेवारी ते इटलीत होते. १२ ते १७ मार्च व्हिएतनाम, १७ ते २३ एप्रिल दुबई, ११ ते १८ जून कतार, २५ जून ते ६ जुलै लंडन, ४ ते ८ सप्टेंबर मलेशियासारख्या परदेश दौऱ्यावर ते गेले होते. दरम्यान, इतकेच नाही तर राहुल गांधी यांनी २०२० ते आतापर्यंत ११३ वेळा सुरक्षा नियमांचे उल्लंघन केले आहे. ज्यात पक्षाच्या भारत जोडो यात्रेचा दिल्लीतील दौऱ्याचाही उल्लेख आहे.