१०,१५, २०, ३० जणांना पक्षाबाहेर हाकलायला हवं; गुजरात काँग्रेस बैठकीत राहुल गांधी संतापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 12:59 IST2025-03-08T12:58:56+5:302025-03-08T12:59:44+5:30
जोपर्यंत आम्ही या लोकांना वेगळे करत नाही तोपर्यंत गुजरातची जनता आपल्यावर विश्वास ठेवू शकत नाही असं राहुल गांधींनी सांगितले.

१०,१५, २०, ३० जणांना पक्षाबाहेर हाकलायला हवं; गुजरात काँग्रेस बैठकीत राहुल गांधी संतापले
अहमदाबाद - गुजरातमध्ये सातत्याने होणारा पराभव आणि पक्ष संघटना वाढीसाठी नेत्यांकडून होणारं दुर्लक्ष यावरून राहुल गांधी चांगलेच संतापल्याचं चित्र समोर आले आहे. शनिवारी अहमदाबादच्या एका कार्यक्रमात राहुल गांधींनी पक्षातील नेत्यांना खडे बोल सुनावले. गुजरातमध्ये काँग्रेस पक्षाला स्पष्ट मार्ग दिसत नाही अशी जाहीर नाराजी राहुल गांधी यांनी व्यक्त केली.
राहुल गांधी यांनी म्हटलं की, मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे, परंतु स्टेजवरून सांगतो, गुजरातमध्ये काँग्रेसला मार्ग सापडत नाही. गुजरात काँग्रेसमध्ये २ प्रकारचे लोक आहेत. एक ते जे जनतेसमोर उभे आहेत, ज्यांच्या मनात काँग्रेसची विचारधारा आहे. दुसरे असे नेते जे जनतेपासून दूर आहेत. संपर्कात नाहीत, त्यातील काही भाजपाच्या जवळ आहेत. जोपर्यंत आम्ही या लोकांना वेगळे करत नाही तोपर्यंत गुजरातची जनता आपल्यावर विश्वास ठेवू शकत नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच गुजरातच्या जनतेला पर्याय हवा, त्यांना बी टीम नको. माझी जबाबदारी या दोन्ही गटातील लोकांना ओळखण्याची आहे. आमच्याकडे बब्बर शेर आहे. जर आपल्याला कठोर कारवाई करावी लागली तरी करणे गरजेचे आहे. १०, १५, २०, ३० नेत्यांना पक्षाबाहेर हाकलायचं झाले तरी केले पाहिजे. भाजपासाठी काँग्रेसमध्ये काम करता, त्यापेक्षा बाहेर जाऊन काम करा. तुम्हाला तिथे जागा होणार नाही, ते तुम्हाला बाहेर फेकून देतील असा खोचक टोलाही राहुल गांधी यांनी पक्षातील नेत्यांना दिला.
LIVE: Addressing Congress Workers | Ahmedabad, Gujarat https://t.co/H5Laio3EVy
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 8, 2025
दरम्यान, मी वरिष्ठ नेत्यांची जिल्हा, ब्लॉक अध्यक्षांची भेट घेतली. तुमच्याशी संवाद साधणे, तुमच्या मनातील गोष्टी ऐकणं माझं काम आहे. त्यातून गुजरातमधील राजकारण, पक्ष संघटना आणि इथल्या सरकारच्या कामकाजाबद्दल अनेक गोष्टी समोर आल्या. परंतु मी इथं फक्त काँग्रेस पक्षासाठी आलो नाही तर राज्यातील युवा, शेतकरी, महिला आणि छोट्या व्यावसायिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आलोय असंही राहुल गांधी यांनी सांगितले.