Rahul Gandhi: “देशाच्या संविधानावर बुलडोजर चालवला जातोय”; राहुल गांधींची घणाघाती टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 18:29 IST2022-04-20T18:27:50+5:302022-04-20T18:29:55+5:30
Rahul Gandhi: भाजपने अंतःकरणातील द्वेषावर बुलडोजर चालवला पाहिजे, या शब्दांत राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे.

Rahul Gandhi: “देशाच्या संविधानावर बुलडोजर चालवला जातोय”; राहुल गांधींची घणाघाती टीका
नवी दिल्ली: देशातील विविध मुद्द्यांवरून केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर विरोधक सातत्याने टीका करताना पाहायला मिळतात. यातच आता राजधानी दिल्लीतील जहांगीरपुरी येथे झालेल्या हिंसाचारानंतर त्या ठिकाणच्या अवैध बांधकामांवर बुलडोजर चालवला जात आहे. त्यावरून आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी टीका केली आहे.
दिल्लीतील जहांगीरपूरी या ठिकाणी सुरू असलेल्या कारवाईला काँग्रेससह आम आदमी पक्षानेही विरोध केला आहे. तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही या कारवाईला विरोध केला आहे. दिल्लीतील जहांगीरपुरी भागात हनुमान जयंतीच्या दिवशी काढण्यात आलेल्या शोभायात्रेवर दगडफेक करण्यात आली होती. त्यानंतर आता त्या भागातील अवैध बांधकामांवर दिल्ली महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. यासंदर्भात राहुल गांधी यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे.
भाजपने अंतःकरणातील द्वेषावर बुलडोजर चालवला पाहिजे
देशाच्या संविधानातील मूल्यांवर हा बुलडोजर चालवला जात आहे. घटनात्मक मूल्यांचा ऱ्हास सुरू आहे. याचा उद्देश हा गरीब आणि अल्पसंख्यांकांना लक्ष्य करणे आहे. भाजपने अंतःकरणातील द्वेषावर बुलडोजर चालवला पाहिजे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. दुसरीकडे, जहांगीरपुरी भागातील अनधिकृत बांधकामावरील दिल्ली महानगरपालिकेच्या कारवाईला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देण्याचा आदेश दिला आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही महापालिकेकडून अतिक्रमण पाडण्याची कारवाई सुरू आहे. मशिदीजवळील अतिक्रमण तोडण्याचे काम सुरू आहे. न्यायालयाने स्थगितीचे आदेश दिलेले असतानाही कारवाई का केली जात आहे, असा सवाल संतप्त नागरिकांमधून केला जात असल्याचे सांगितले जात आहे.